महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत पत्त्याप्रमाणे कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, मात्र ही दुर्घटना घडल्यानंतरदेखील अद्याप नागरिक आणि प्रशासन जागे झालेले नाही. पालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी मात्र अद्याप आपला रहिवास सोडलेला नाही. थातूरमातुर दुरुस्त्या करून इमारत विकासक त्यांना विश्वासात घेवून इमारतीमध्ये राहण्यास भाग पाडत आहेत. याबाबत पालिकेने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत 24 ऑगस्ट 2020 रोजी पत्त्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले होते. कोकणातील या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले. तारिक गार्डन दुर्घटनेनंतर मात्र प्रशासन हादरून गेले. महाड शहरातील सर्वच इमारतींची चौकशी सुरू झाली. धोकादायक वाटणार्या इमारतींची तपासणी सुरु करण्यात आली. महाड नगर पालिकेने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जवळपास 304 इमारतींची तपासणी केली होती. त्यामध्ये अतिधोकादायक म्हणून 34 इमारतींचा समावेश करण्यात आला होता. या इमारतींमधील रहिवाशांना इमारत सोडण्याचा सल्ला देण्यात आला. काही इमारतीमधील रहिवाशांनी जीवाच्या भीतीने तत्काळ इमारती खाली केल्या. तर इमारत विकासक आणि सत्ताधारी लोकांच्या कटूत्यातून काही इमारतीमधील रहिवाशांना पोलीस बळाचा वापर करत खाली करण्यात आले. मात्र हा नियम पालिकेने सर्वत्र न लावता केवळ नोटीसा बजावत हात वर केले आहेत. यामुळे शहरातील धोकादायक इमारतीमधील रहिवाशी आजही तसेच राहत असल्याचे दिसून येत आहे. महाडमधील या धोकादायक इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करण्याबाबत धोकादायक इमारतींना कळवले होते. त्याप्रमाणे अनेक इमारतीमधील रहिवाशांनी खाजगी एजन्सीमार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण करून घेतले आहे. मात्र यामध्येदेखील घोळ झाल्याचे अमिना इमारतीच्या बाबतीत झालेल्या तक्रारीनंतर उघड झाले आहे. इमारत विकासक आपल्या मर्जीतील एजन्सीमार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण करून घेवून थातूरमातुर दुरुस्ती करत आहेत. यामुळे इमारतीचे जीवन किमान पाच वर्षांनी पुढे ढकलत आहे. यामुळे कांही रहिवाशांनी इमारत खाली केली असली तरी अनेक रहिवाशी याच धोकादायक इमारतीमध्येच राहत आहेत. अमिना इमारतीमधील रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर महाड नगर पालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ या सरकारी स्तरावर संरचनात्मक लेखापरीक्षण करून घेतले होते, मात्र हे प्रकरण न्यायालयीन पातळीवर गेल्याने आजही प्रलंबित आहे. याचप्रमाणे महाड मधील तुळजाभवानी इमारतीमधील पाच कुटुंब सोडून अन्य रहिवाशांनी इमारत खाली केली आहे. हा वाददेखील अद्याप पालिका स्तरावर प्रलंबित असल्याने इमारत नव्याने बांधकाम करणे तसेच पडून आहे. महाड शहरातील पानसारी मोहल्ला परिसरातील मदिना इमारतदेखील धोकादायक स्थितीत असल्याने महाड नगर पालिकेने त्यांना दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी इमारतीमधील रहिवाशांना इमारत सोडण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र याठिकाणीदेखील काही रहिवाशांनी आपली घरे खाली केली असली तरी अद्याप अनेकांनी आपली घरे खाली करण्यास नकार दर्शवला आहे. इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून थातूर मातुर दुरस्ती केली आहे, मात्र या इमारतीपासून शेजारील घरांना धोका निर्माण झाला आहे. इमारतीचे प्लास्टर शेजारील घरासमोर पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्याने शेजारी राहणारे नागरिक जीव मुठीत घेवून जीवन जगत आहेत. याबाबत स्थानिक नागरिक निसार फामे यांनी महाड नगर पालिकेकडे रीतसर तक्रार केली आहे, मात्र निसार फामे यांना इमारतीमधील रहिवाशी पोलीस बळाचा वापर करून जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. इमारत विकासक इमारतीमधील वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना हाताशी धरून तक्रारदार रहिवाशांना त्रास देत असल्याचे प्रकार उघड होत आहेत. असाच त्रास अमिना इमारतीमधील रहिवाशांना देखील सहन करावा लागत आहे. शहरातील तुळजाभवानी कॉम्प्लेक्समधील कांही रहिवाशांनी अद्याप आपला निवास न सोडल्याने इमारत विकासक सदर इमारत तोडून बांधण्यास तयार असतानादेखील ही इमारत बांधकामापासून वंचित राहिली आहे.
-महेश शिंदे