Breaking News

खालापुरात मुंगूर व्यावसायिकांना दणका

पाताळगंगा नदीतून पाणी चोरीप्रकरणी कारवाई; साहित्य जप्त

खोपोली ः प्रतिनिधी
मुंगूर तलावासाठी नदीतून बेकायदेशीर पाणी उपसा करणार्‍यांवर पाटबंधारे विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून पाणी उपसाचा पंप जप्त करण्यात आला आहे. महड, हाळ भागात मंगळवारी (दि. 28) ही कारवाई करण्यात आली.
रायगड सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापुरात विविध ठिकाणी कारवाईचे सत्र सुरू आहे. मुंगूर मत्स्यपालन पातळगंगा नदीकिनारी मोठ्या प्रमाणात होत असून तलावासाठी नदीतील पाण्याचा उपसा होत असल्याने पाटबंधारे विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी महड, हाळ भागात पाटबंधारे विभाग कर्जतचे उपविभागीय अभियंता भरत गुंटूरकर, शाखा अभियंता संदेश मेंगाल, महादू सुपे, राम वाघ, बंडू चव्हाण, हनुमंत कालेकर, तहसील विभागाकडून तलाठी सुवर्णा चव्हाण, पोलीस ठाणे खालापूरचे पोलीस हवालदार एम. जी. सिरतार, महावितरणचे अमोल कदम यांच्या संयुक्त पथकाने नदीपात्रात सोडण्यात आलेले पंप जप्त केले आहेत.
या पंपासाठी अनधिकृतपणे घेण्यात आलेला विद्युत पुरवठादेखील महावितरण कर्मचारी तपासत असून कारवाई करणार आहेत. पाटबंधारे विभागाच्या कारवाईचे खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून मुळावरच घाव घातल्याने मुंगूर उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. दिवसाढवळ्या वीज व पाणी चोरी होत असून संबंधित विभागाने तातडीने कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

महड आणि हाळ भागात मंगळवारी कारवाई करण्यात आली. तालुक्यात अन्य ठिकाणीदेखील मुंगूर तलावासाठी बेकायदेशीरपणे नदीतून पाणीउपसा सुरू असल्यास पंप जप्तीची कारवाई सुरू राहणार आहे.
-भरत गुंटूरकर, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, कर्जत

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply