Breaking News

शेतकर्‍यांचा आवाज शासनदरबारी पोहचविणार; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ग्वाही; प्रकल्पग्रस्तांचे उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनबाधित शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून दिला जाईल, असा शब्द विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिल्याने शेतकर्‍यांनी सुरू केलेले साखळी उपोषण स्थगित केले आहे. येत्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा आणि मंत्रालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी, रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनी आणि शासनाने नियुक्त केलेले सक्षम अधिकारी यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दरेकर यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिले.रिलायन्स कंपनीकडून टाकण्यात येणार्‍या इथेन गॅस पाइपलाइनला जमीन देणार्‍या कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी जागेच्या मोबदल्यासाठी 19 ऑगस्ट रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला भाजपने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा दिला होता. उपोषाणाची दखल कोकण दौर्‍यावर असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली आणि त्यांनी दूरध्वनीद्वारे शेतकर्‍यांशी संपर्क साधला. या वेळी दरेकर यांनी न्यायासाठी उपोषणाचे हत्यार उपसणार्‍या शेतकरीवर्गाशी चर्चा केली. या संदर्भात मंत्रालय स्तरावर संयुक्त बैठक घेऊ. त्यातूनही शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही, तर येत्या अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा घडवून आणली जाईल आणि शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दरेकर यांनी दिले. यानंतर उपोषणस्थळी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत सक्षम अधिकारी आणि रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनी प्रशासन यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्याचे लेखी आश्वासन शेतकर्‍यांकडे सुपूर्द केले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आणि गणेशोत्सव येत असल्याने उपोषण स्थगित करण्याची विनंती तहसीलदार देशमुख यांनी प्रशासनाच्या वतीने उपोषणकर्ते शेतकर्‍यांना केली. त्यानुसार शेतकर्‍यांनी उपोषण स्थगित केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply