Breaking News

विहिरींमध्ये जलपुनर्भरण करण्याची गरज

पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमुनेही आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुण्यातील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रुग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलाचा  गोपनीय अहवाल सादर केला होता. त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या राजकीय प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली असल्याने ही दूषित पाणी नमून्यांची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पोलादपूर तालुक्यामध्ये विविध जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली जात असल्याने टंचाई आराखड्यातून टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्याच्या पाणीटंचाई उपाययोजना कृती आराखड्यामध्ये पंचायत समितीमार्फत 2010-11मध्ये तीन वेळा बोअरवेल आराखडा प्रस्तावित करण्यात आला.  पहिल्या आराखड्यात 1 जानेवारी ते 31 मार्च 2010दरम्यान 15 गावे आणि 61 वाड्यांचा समावेश या बोअरवेल प्रोग्राममध्ये करण्यात आला. 1 एप्रिल ते 30 जून 2010च्या बोअरवेल प्रोग्राममध्ये आठ गावे 13 वाड्यांचा समावेश करण्यात आला. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2011 या कालावधीतील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात 42 गावे आणि 172 वाड्यांमध्ये अशा एकूण 214 ठिकाणी बोअरवेलची उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव करण्यात आला. याच पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात 1 जानेवारी ते 31 मार्च 2012मध्ये चार गावे आणि 22 वाड्या अशा एकूण 26 ठिकाणी बोअरवेल खणण्याचा प्रस्ताव करण्यात आला. या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात 31 डिसेंबरपर्यंतची बोअरवेलची प्रस्तावित मागणी आणि 31 मार्च 2012पर्यंत बोअरवेलची प्रस्तावित मागणी पाहता आता प्रत्यक्ष आराखड्यात तातडीने मंजुरी होऊ शकेल, अशी संख्या केवळ 26 बोअरवेलची असल्याने यामध्ये 40 बोअरवेलची विशेष अत्यावश्यक बाब म्हणून मागणी प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पाणीटंचाई निवारण कृती समितीकडे सादर करण्यात आला. यामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात भूजल उपशासाठी बोअरवेल करण्यात आल्याचे निष्पन्न होत असून पुणे येथील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेच्या गोपनीय अहवालाकडे यामुळे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याखेरिज नळपाणीपुरवठा योजनांच्या साठवण टाक्यांना झाकणे बसविली नसणे, पाणीपुरवठ्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न नसणे, नळ योजनेच्या पाईपलाईनची गटार व अन्य भागातून जोडणी, गंजलेले पाईप अशा अनेक बाबी पेयजलाचे नमुने दूषित असण्यास कारणीभूत ठरले आहेत. रायगड जिल्ह्यातील जिल्हा प्रयोगशाळा अलिबागकडून पोलादपूर तालुक्यातील ऑक्टोबर 2012मध्ये पाठविण्यात आलेले 37 दूषित पाण्यांचे नमुने तपासून आले असता त्यापैकी 13 पाणी नमुन्यांचा अहवाल पिण्यास योग्य असा प्राप्त झाल्याने नोव्हेंबर 2012मध्ये पुन्हा त्याच ठिकाणी दूषित पाण्याचे नमुने घेऊन जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे, मात्र तालुक्यातील लोकवस्तीला पेयजलासाठी उपलब्ध सर्व स्रोतांचे नमूने एकाचवेळी संकलित करून पाठविले गेले असता या पाण्याचा अहवाल पाहता कोणताही प्रदुषणकारी कारखाना नसूनही हे पाणी नैसर्गिकरित्या पिण्यास अयोग्य असल्याचा अभिप्राय आश्चर्यकारक असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर 2012मध्ये आडावळे बुद्रकु बौद्धवाडी हातपंप, कापडे बुद्रुक भराववाडी हातपंप व भवानवाडी हातपंप, देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत हळदुळे येथील बोअरवेल, देवळे येथील नळपाणी योजना, देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दाभिळ येथील नळयोजना, बोरावळे येथील गुडेकरकोंड येथील झर्‍याच्या पाण्याचा स्रोत, भोगाव खुर्द येलंगेवाडीतील साठवण तलाव, कोतवाल खुर्द येथील सार्वजनिक नळ, देवपूर ग्रामपंचायत हद्दीतील गांजवणे येथील सार्वजनिक नळ, वझरवाडी येथील सुरबाचीवाडी साठवण टाकी, सडवली ग्रामपंचायत हद्दीतील चोळई नळ पाणीपुरवठा योजना आणि चोळई येथीलच दुसरी नळ पाणीपुरवठा योजनांचे पाणी दूषित असल्याचा अहवाल जिल्हा प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला असून दूषित पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण 35 टक्के असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने केवळ दूषित पाण्यामुळे पसरणारे साथीचे आजार पोलादपूर तालुक्यात दिसून येत नसल्याचे समाधान न मानता फ्लोराईडस् व अन्य घातक क्षारयुक्त पाणी पिण्याने तालुक्यातील जनजीवनावर होणारे दूरगामी घातक दुष्परिणाम लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली असून पहिले दूषित पाणी नमुन्याचे प्रमाण कमी करण्यासाठी दुसर्‍यांदा पुन्हा नव्याने तेथील पाण्याचे नमुने पाठविण्याचा प्रकार ही वेगळीच अजब उपाययोजना असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. पोलादपूर तालुक्याच्या 2022 या गेल्या वर्षीच्या पाणीटंचाई निवारण आराखड्यामध्ये भूजल उपसा करण्याकामी 13 गावे आणि 55 वाड्यांमध्ये अशा 68 ठिकाणी सुमारे 40 लाख 80 हजार रुपयांची विंधन विहिरी घेण्याची मागणी समाविष्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत विंधन विहिरी दुरूस्ती आणि विंधन विहिरी घेण्याच्या उपाययोजनांमुळे पोलादपूर तालुक्यात भुमातेला हजारो छिद्र पाडून दररोज लाखो लिटर्स पाण्याचा उपसा केला जात असून भुजलाचा पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात घटत आहे. एकीकडे जमिनीवरील पाण्याचा साठा संपुष्टात येत असताना भुजलाच्या पाण्याचे प्रदूषण व मोठ्या प्रमाणात उपसा या बाबींकडे आता फार काळ दुर्लक्ष करून चालणार नाही. भूगर्भातील पाणी उपसून झाल्यानंतर पुन्हा धरणी मातेचे पाण्याचे ॠण फेडण्यासाठी जलपुनर्भरण करण्याची निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची संकल्पना ग्रामीण भागातही युद्धपातळीवर राबवली असून दरवर्षी पावसाळ्यात विंधन विहिरींमध्ये छपरावरून वाहून जाणारे पाणी पुन्हा भरल्यास बारमाही जलस्रोत खुला राहू शकतो. प्रत्येक पंचायत समितीने वनराई बंधार्‍यांचे उद्दिष्ट ओलांडून मोठया प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने 2014-22दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तीन आठवडे उशिरा मागणी झाली हे बंधार्‍यांचे यश आहे. विहिरींच्या जलपुनर्भरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची जबाबदारीही लोकसहभागातून घेतल्यास अधिकाधिक बोअरवेलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाने जलपुनर्भरण करून भुजलाची पातळीही वाढविणे शक्य होणार आहे. ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमामध्ये पोलादपूरचे गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी पोलादपूर तालुक्यातील श्रीसदस्यांच्या जलसंधारणाच्या कामांमुळे तालुक्यातील पाणीटंचाईचा कालावधी कमी झाला असून अनेक गावे टंचाई निवारण आराखड्यातून वगळण्यात आली असल्याची माहिती दिली.

-शैलेश पालकर

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply