Breaking News

पेणमध्ये रस्त्याच्या निधीसाठी ग्रामस्थांचे निवेदन

पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताडमाळ व तुरमाळ या आदिवासी वाड्यांना रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी 5 एप्रिलला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला असून याबाबत एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना निवेदन देण्यात आले. जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ताडमाळ, तुरमाळ, पहिरमाळ, गुतीचीवाडी, चाफेगणी या महसूली आदिवासी वाड्या येत असून तेथील आदिवासींना ये-जा करण्यासाठी रस्त्याची उपलब्धता नाही. गेली दोन वर्ष या आदिवासी वाड्या अर्ज व विनवण्या करीत आहेत, पण त्यांच्या रस्त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. 26 ऑक्टोबर 2021 व 21 फेब्रुवारी 2022 रोजी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना ताडमाळ या कातकरीवाडीला रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावे म्हणून निवेदन दिले होते. त्यानंतर जिर्णे ग्रामपंचायतीने 1 डिसेंबर 2022 तसेच ताडमाळ, कातकरीवाडीच्या ग्रामस्थानी 11 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज दिला. गेली दोन वर्षे ताडमाळ ग्रामस्थ निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करीत आहेत तसेच जिर्णे ग्रामपंचायतीकडूनदेखील कार्यक्षेत्रात येणार्‍या ताडमाळ आणि तुरमाळच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून पत्रव्यवहार होत आहे, मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेणच्या कार्यालयाला आदिवासी बांधव-भगिनींच्या शिष्ट मंडळाने भेट देउन निवेदन दिले. युद्धपातळीवर ताडमाळ आणि तुरमाळ या आदिवासी वाड्यांना रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही, तर 5 एप्रिल 2023 रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना दिला. प्रकल्प अधिकार्‍यांनी शिष्टमंडळाची बाजू ऐकूण ताडमाळ आणि तुरमाळ या दोन्ही आदिवासीवाड्यांना जाण्यासाठी ठक्कर बाप्पा या योजनेतून निधीची उपलब्धता करून देतो असे सांगितले तसेच 1 तारखेनंतर या रस्त्याची पाहणी करण्यासाठी कार्यालयीन निरीक्षकांना पाठवितो आणि या वाड्यांची किती लोकसंख्या आहे त्यानुसार निधीची उपलब्धता करून देतो असे सांगितले. 5 तारखेच्या अगोदर जर निरिक्षक पाहणी करण्यासाठी आले नाही तर 5 एप्रिल रोजी आम्ही उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घेणार नाहीत, असे आदिवासींनी सांगितले. या वेळी दोन्ही आदिवासी वाड्या मिळून मोठ्या संख्येने महिला व पुरूष उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply