कर्जत शहराच्या बाजूने उल्हास नदी वाहते. या नदीकडे बघून मन प्रसन्न होत असते, परंतु पावसाळा आला की नदीच्या काठावर राहणार्या रहिवाशांच्या पोटात दररोज रात्री गोळा येतो कारण अतिवृष्टीमुळे ही नदी उलटून तिचे पाणी कधीही कर्जत शहरात घुसत असे. त्यामुळे नदीच्या किनार्यावर असलेल्या रहिवाशांना रात्र रात्र जागून काढावी लागत असे. यावर उल्हास नदीची गेली दोन वर्षे गाळ काढून साफ सफाई करणे हे वरदानच ठरले. याचे श्रेय आमदार महेंद्र थोरवे यांना जाते. या उपक्रमामुळे कर्जतकरांना रात्रीची मस्त झोप लागू लागली आहे.
उल्हास नदीच्या काठावर कर्जत शहर वसलेले आहे. या भागातील भगवान टॉकीज, भगत निवास पासून संपूर्ण कोतवाल नगर मधील रहिवासी पावसाळ्यात रात्र-रात्र जागून काढत असत. दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पात्र उलटून ते पाणी शहरात घुसून संपूर्ण जनजीवन विस्कळीत करीत असे. 1989 च्या पुरात दोन-तीन जण वाहूनही गेले आहेत. त्यामुळे रात्री पाऊस सुरू झाला की, रहिवाशांच्या उरात धडकी भरत असे. याच भागात टेलिफोन एक्सचेंज असल्याने जास्त पाऊस होऊन पूर आला की, एक्सचेंजमध्ये पाणी शिरत असे आणि परिणामी संपर्कही तुटत असे. अगदी आठवडे दोन आठवडे एक्सचेंज बंद पडत असल्याने सारीच पंचाईत होत असे.
कर्जत शहरातील आमराई भागात कुलाबा लोकल बोर्ड असताना पादचारी पूल वजा बंधारा उभारण्यात आला होता. बंधारीतील पाणी सोडण्यासाठी एकच छोटासा गोलाकार दरवाजा होता व त्याला चावीची झडप होती. पावसाचा अंदाज न आल्याने नदीत खूप पाणी असल्याने ती झडप उघडणे कधी कधी शक्य होत नव्हते. तर अतिवृष्टीत झडप उघडूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जात नसल्याने नेहमीच नदीचे पात्र उलटून काठावरील रहिवाशांच्या घरात पाणी शिरत असे. कित्येक वर्षे हा त्रास कर्जतकरांना सहन करावा लागला होता.
सुनील तटकरे जलसंधारण मंत्री असताना तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी नवीन बंधारा वजा पादचारी पूल आणि नदीच्या किनारी संरक्षक भिंत उभी करण्यास मंजुरी दिली आणि ते काम पूर्ण करण्यात आले. पूर्वी बांधल्या बंधार्याला केवळ एकच दरवाजा होता. अचानक अतिवृष्टी झाली की हा दरवाजा उघडणेसुद्धा कठीण होऊन बसायचे. नवीन बंधार्याला 38 दरवाजे करून पाणी अडविण्यासाठी झडपा बसवण्यात आल्या. पाऊस कमी झाल्या की झडपा लावून पाणी अडविण्याचे काम होत आहे. पावसाळ्यात सर्वच्या सर्व झडपा काढून टाकल्याने पाणी झटकन निघून जात असे आणि शहरात पाणी येत नसे. त्यातूनही एक दोन वेळा पाण्याची पातळी संरक्षक भिंती वरून उलटण्याची शक्यता निर्माण झाल्याने तत्कालीन आमदार लाड यांनी नदीचा गाळ काढण्याचा उपक्रम उद्योजक भगवान भोईर यांच्या सहकार्याने हाती घेतला व नदीची साफ सफाई केली. त्यामुळे दहा – बारा वर्षे कितीही पाऊस झाला तरी नदीचे पात्र खोल झाल्याने उलटत नसे.
2021 च्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नदीचे पात्र इतके उलटले की, संरक्षक भिंत सोडाच आयुष्यात ज्या नानामास्तर नगर मध्ये कधी पाणी आले नाही तेथील घरांमध्ये दोन – अडीच फूट पाणी आले आणि पुन्हा एकदा राहिवाश्यांच्या पोटात गोळा येऊ लागला. त्यावर काय उपाय करावा या चिंतेत सारे जण असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी 2022 च्या उन्हाळ्यात नदीचा गाळ काढून नदी संवर्धनाचे काम हाती घेतले त्यामुळे गेल्या वर्षी खूप पाऊस झाला तरी नदीचे थेंबभर पाणी उलटले नाही आणि कर्जतकरांनी निश्वास सोडला.
यावर्षी कर्जत तालुक्यात यावर्षातील सर्वाधिक 262 मिली पाऊस काल पडला असून आजदेखील पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असली तरी कर्जत शहरातील नागरिकांना असलेली महापूराची भीती यावेळी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन कडून करण्यात आलेल्या नदी खोलीकरण कामामुळे दूर झाली आहे. गतवर्षी इंदिरा नगर, बामचा मळा या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीचा सर्वांत मोठा महापूर आज आला असून सर्वत्र पावसाने हाहाकार माजविला असताना कर्जत शहरातील नागरिकांनी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसल्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कर्जत श्रीराम पुल येथील पाण्याचा बंधारा येथे 48 मीटर उंचीचा असून त्या ठिकाणी पाण्याची पातळी 46 मीटर पर्यंत पोहचली होती. त्यामुळे कर्जत शहरात नागरी वस्तीत कुठेही पाणी शिरण्याची घटना घडली नाही आणि त्याचे श्रेय आमदार महेंद्र थोरवे तसेच पालिकेचे स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांना जाते. हे कटू सत्य आहे.
– विजय मांडे
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …