Breaking News

आदिवासींच्या सुरक्षिततेसाठी आमदार महेश बालदी दक्ष

वाड्यांची पाहणी करून जाणून घेतल्या समस्या

मोहोपाडा ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यतत्पर आमदार महेश बालदी सातत्याने घटनास्थळी असून आवश्यक ते सहकार्य करीत आहेत. दरम्यान, इतर आदिवासीवाड्यांमध्ये असा प्रकार घडू नये यासाठी त्यांनी आदिवासी समाजाचे नेते व यवतमाळमधील आमदार
डॉ. संदीप धुर्वे यांच्यासमवेत पाहणी करून आढावा घेतला.
इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी या भागाचा दौरा करीत आहेत. शासकीय यंत्रणा आणि सेवाभावी संघटना बचाव व मदतकार्य करीत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
निर्देशानुसार आदिवासी समाजाचे यवतमाळमधील केळापूर मतदारसंघाचे आमदार शनिवारी (दि. 22) इर्शाळवाडीत पोहचले. त्यांनी स्थानिक आमदार महेश बालदी यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर बोरगाव, तारवाडी, चांगवाडी येथील आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन तेथील जागेची पाहणी करण्यात आली. या वेळी आमदारांनी तिथे राहणार्‍या आदिवासी, ठाकूर समाजाच्या लोकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी सध्या मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही शासनाचे लक्ष वेधले आहे.
इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना सध्या राहण्यासाठी केलेल्या जागेची पाहणी करून त्यांना काही कमी नाही पडणार याकडे आम्ही लक्ष घातले. दरडग्रस्त कुटूंबांना आधार दिल्यामुळे तेथील सर्व रहिवाशांनीदेखील आपली घरे सोडून सुरक्षितस्थळी येण्यासाठी संमती दर्शविलेली आहे, असे आमदार महेश बालदी म्हणाले.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, सरचिटणीस प्रवीण मोरे, तुपगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र कुंभार, उपसरपंच सुयोग भालेकर, बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रितेश मोरे, चौक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश कदम, युवा उद्योजक सागर देशमुख, सागर ओसवाल, प्रकाश घोगरे, नंदकुमार सोनवणे, विजय ठोसर, गणेश मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरडप्रवण भागाचा आढावा
सतत पडणार्‍या पावसामुळे काही डोंगरांना भेगा पडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी मोठे दगड पडण्याची भीती आहे. अशा सर्व जागांची पाहणी करून तेथील आदिवासी बंधू-भगिनींना विश्वासात घेऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारच्या माध्यमातून जे जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल तसेच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहेत. फक्त आपली मानसिकता आणि तयारी दाखवा. आपले जीवन व कुटुंब आमच्यासाठी मौल्यवान आहे, अशा शब्दांमध्ये सर्वांना विनंती करून सर्वांना सुरक्षितस्थळी आणण्याचे काम येत्या काही दिवसांतच करण्यात येईल, असे आमदार महेश बालदी यांनी या वेळी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply