Breaking News

अतिवृष्टीने हाहाकार

गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात दाणादाण उडाली आहे. सततच्या पावसाने चांदा ते बांदा हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला, तर राज्यात विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

जून महिन्यात ‘येरे येरे पावसा’ म्हणणार्‍या लोकांवर पुढच्या एकाच महिन्यात आता बस्स् म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यात काही भाग वगळता तुफान पाऊस पडला आहे. यंदा मान्सून लांबल्याने बळीराजासह नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पावसाळ्याला ज्या जून महिन्यात सुरुवात होते त्या वेळी सारे जण वरुणराजाची चातकासारखी वाट पाहत होते. त्यातच प्रचंड उकाडा होत असल्याने अस्वस्थ व्हायला होत होते. दुपारी तर घराबाहेर पडणे कठीण होऊन बसले होते. जून महिना कोरडा गेला. त्यामुळे सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले असताना जुलैच्या पंधरवड्यानंतर मुसळधार पाऊस पडू लागला. सरत्या आठवड्यातील बुधवारपासून तर ‘कोसळधार’ सुरू होती. त्यामुळे अनेक भागांत दाणादाण उडाली. याचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला. कोकणात पर्जन्यवृष्टी झाल्याने नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले. परिणामी पूरपरिस्थिती निर्माण झाली. घरे, रस्ते, शेती सर्वत्र पाणीच पाणी झाले. रायगड जिल्हा जलमय होऊन वाताहत झाली. नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. धुवांधार पावसात खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून माणसांसह घरे ढिगार्‍याखाली गाडली गेली. दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे, तर दुसरीकडे मदतीचा ओघ सुरू आहे, मात्र या नैसर्गिक आपत्तीमध्ये कित्येकांचा मृत्यू झाला असून काही जण बचावले आहेत. वाचलेल्यांचे सुयोग्य पुनर्वसन करणे हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्या दृष्टीने शासन-प्रशासन कार्यरत आहेत. कोकणानंतर विर्दभ, मराठवाड्यात पावसाने आपला मोर्चा वळविला. यवतमाळ, नांदेड, अकोला, अमरावती, गडचिरोलीत जबरदस्त पडलेल्या पावसाने मोठी हानी केली आहे. दुर्दैवाने काही जण वाहून गेले. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना एनडीआरएफच्या पथकांनी स्थानिकांच्या मदतीने वाचविले. एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरींवर सरी बरसत असताना मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर भागांत विशेष पाऊस नव्हता. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या काही भागांत हवामान कोरडे होते. पावसाअभावी काही ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली असून शेतकर्‍यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट उभे राहिले आहे. असे विषम चित्र पहावयास मिळत आहे. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. दोन महिन्यांत जलाशये भरल्यानंतर बाकीचे पाणी समुद्राला जाऊन मिळते, जे फुकटच जाते. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसत असतात. पावसाळ्यात मात्र उलटेच घडते. हे उरलेले पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविणे गरजेचे आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. यावर भविष्यात काम केल्यास पाण्याचा असमतोल नष्ट होऊन सर्वांना ‘जीवन‘ मिळेल.

Check Also

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …

Leave a Reply