Breaking News

‘यादों की बारात’

 

स्टोरीपासून पोस्टरपर्यंत सगळेच हिट!

‘स्वदेस’मध्ये ‘यादों की बारात’
तुम्हाला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’स्वदेस’ ( 2003) आठवतोय? त्यात ग्रामीण भागातील रस्त्यावरच्या चित्रपटा’चा एक प्रसंग आहे. तेव्हा ‘यादों की बारात’ दाखवला जात असताना दिसते. या दृश्यात कोणता चित्रपट दाखवायचा यावर या चित्रपटाचा निर्माता आमिर खान व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात चर्चा झाली असतानाच आमिर खानने आपले काका नासिर हुसेन दिग्दर्शित ’यादों की बारात’चे नाव सुचवले आणि त्याची प्रिन्ट उपलब्ध करून दिली. ’यादों की बारात’ची अशीही एक आठवण.

शाकाल जब बाझी खेलता है, तो जितने पत्ते उसके हाथ मे होते है उतने ही उसके आस्तीन मे… जब दिल बहुत कुछ कहने को चाहे और जुबान साथ ना दे… तो ये मोहब्बत की पहेली सीडी होती है… पिलाना भी फर्ज था तो कुछ भी पिला दिया होता… शराब कम थी तो पानी मिला दिया होता… मै अपने प्लॅन को खुद बनाता हूँ… जो अपनी जान पर खेलते है… वो अपनी मंझिल खुद ढूंढते है। प्रत्येक डायलॉगवर थिएटरमध्ये पब्लिकच्या टाळ्या शिट्ट्या… जगभरात कुठेही ठरवून सुपर हिट पिक्चर काढू शकले असते तर जगभरातील चित्रपटाचा इतिहास, भूगोल, अर्थकारण, अंकगणित असं सगळेच बदलले असते, पण एकाद्या सुपरड्युपर हिट पिक्चरमध्ये योगायोगानेच सगळेच गुण जुळलेले दिसतात. याचा अर्थ ते पिक्चर काही सॉलीड वगैरे असते नाही वा चाकोरीबाह्य् थीमवरचे असते असेही नाही. तरी पब्लिकने पिक्चर डोक्यावर नि डोक्यात घेतलेले असते. ’यादों की बारात’ असाच मसालेदार मनोरंजक हिट चित्रपट. 2 नोव्हेंबर 1973 रोजी पडद्यावर आला तोच फर्स्ट शोपासूनच सुपर हिट. पन्नास वर्षे पूर्ण होऊनही तो पुन्हा पुन्हा एन्जॉय करताना छान टाईमपास होतोच.
बरं पिक्चरची स्टोरी काय? तर लहानपणी तीन भाऊ आपल्या आई-वडिलांसोबत एका भावाच्या वाढदिवसानिमित्त केक कापून ’यादों की बारात निकली है आज दिल के व्दारे’ हे गाणे गात असतानाच खलनायक शाकाल (अजित) आपल्याविरुद्ध पोलिसात साक्ष दिलेल्याचा खातमा करण्यासाठी येतो. तो या माता पित्याचा खून करतो. दोन लहान मुल पळतात. त्यातला धावती एक मालगाडी पकडतो. एक मागे राहतो. तिसरा धाकटा भाऊ घरातील नोकराणीसोबत असतो. तीन भाऊ तीन ठिकाणी लहानाचे मोठे बनतात. शंकर (धर्मेंद्र) ’चोर नायक’ बनतो. रतन (तारीक) एका मोठ्या हॉटेलमध्ये वादक गायक बनतो. धाकटा भाऊ विजय (विजय अरोरा) त्याच हायफाय हॉटेलमध्ये नोकरीला लागतो. त्याची आणि सुनीताची प्रेमकथा सुरू होते. शंकर विरुद्ध शाकाल असा सामना सुरु होतो. अधेमधे गीत संगीत व नृत्य येत राहते. ते लोकप्रिय असल्यानेच आपण एन्जॉयही करतो. आणि क्लायमॅक्सला रतन नेहमीप्रमाणेच आज आपण लहानपणीचे गाणे गाऊया ते ऐकून आपले भाऊ सापडतील अशी आशा ठेवतो. ती आशा खरीच ठरते. संपूर्ण पिक्चरभर एकमेकांना पाहत असलेले हे तिघे आपण लहानपणीच हरवलेले भाऊ आहेत हे आता ओळखतात. शंकर शाकालचा खातमा करतो आणि पिक्चर द एन्ड.
लहानपणीच जत्रेत अथवा वादळात वा भूकंपात तीन भाऊ आपल्या मातापित्यांसह हरवतात. पाचजण पाच ठिकाणी असतात आणि अठराव्या रिळात एकमेकांना सापडतात. पिक्चरचा शेवट गोड होतो हे मुख्य प्रवाहात सर्वप्रथम सुपर हिट ठरले ते बी.आर. चोप्रा निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित बी. आर. फिल्मच्या ’वक्त’ ( 1965) पिक्चरच्या वेळेस. चित्रपट माध्यमातील पकड घेणारी पटकथा व प्रभावी संकलन याचे उत्तम उदाहरण म्हणजे ’वक्त’ पिक्चर. एकाच वेळेस अनेक व्यक्तीरेखांना गुंफणे आणि भिन्न मूडसच्या कलाकारांना घेऊन पिक्चर पडद्यावर आणणे हे सोपे नाही. यशजींचा हा फिल्म मेकिंगमधला एक लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड मसाल्याचा चित्रपट. त्यावरूनच सलिम जावेद यांनी ’यादों की बारात’ची मांडणी, बांधणी केली हे अधूनमधून दिसत राहते. खरंतर दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी ’हरवले गवसले’ यात जणू पीएचडी केली. कधी दोन भाऊ (भाई हो तो ऐसा, रामपूर का लक्ष्मण), कधी तीन भाऊ (अमर अकबर अ‍ॅन्थनी) असेच लहानपणीच हरवून पिक्चरच्या शेवटच्या रिळात सापडतात. अधेमधे काही योगायोगाच्या तर काही अतर्क्य गोष्टी..ते काही असले तरी पब्लिकची भारी पसंती. निर्माता व दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी ’यादों की बारात’मध्ये असं वेगळे काहीही मांडलं नाही. या फॉर्मुल्यात वेगळे असे करणार काय? तरीही ’यादों की बारात’ भारी मनोरंजन ठरला तो सलिम जावेदची टर्न आणि ट्विस्ट असलेली पटकथा, काही चमकदार संवाद, धर्मेंद्रची डॅशिंग भूमिका (याच पिक्चरने त्याला ही मॅन इमेज दिली. त्याने सोबर कात टाकली ती कायमची. गंमत म्हणजे, ’वक्त’मधील राजकुमारने साकारलेली भूमिका ’मोठ्या भावाची भूमिका नको, तशाच भूमिका ऑफर होतील म्हणून धर्मेंद्रने नाकारली आणि यावेळेस आपली करिअर बरीच पुढे गेली आहे या जाणिवेने स्वीकारली), झीनत अमानचा मधाळपणा (सेक्स अपील), तारीकचा म्युझिकल परफॉम्स, मजरुह सुल्तानपुरी यांची गीते, राहुल देव बर्मनचे तरुण संगीत आणि चक्क या सगळ्याची भट्टी जमून आली आणि पिक्चर सुपर हिट. विजय अरोराची भूमिकेसाठी नासिर हुसेन यांनी अमिताभ बच्चनच्या नावाचा विचार केला होता. तेव्हा नेमका त्याचा पडता काळ सुरू होता म्हणून वितरक नको म्हणाले. नेमका ’जंजीर’ 1973च्याच मे महिन्यात पडद्यावर येताच सुपर हिट ठरला. आता पाच महिने होताहेत तोच ’यादों की बारात’ आला. काही म्हणा, अमिताभ यात सूट झाला नसता. झीनत अमानने पारंपरिक वस्त्रात असावे ही नासिर हुसेनची इच्छा तिने नाकारून पाश्चात्य लूकच्या वस्रांना पसंदी देताना डिसेण्डपणा जपला. ग्रेसफुल ठरली. नीतू सिंग लेकर हम दीवाना दिल गाण्यात व काही दृश्यात होती इतकेच. पिक्चर हिट झाल्याने तीही प्रकाशली.
सलिम जावेदची बंदिस्त पटकथा व संवाद असलेला प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’जंजीर’ तुफान सुपर हिट ठरल्याने माहौल बदलला होता. आता ’यादों की बारात’ रिलीज होताना पोस्टरभर तीन हुकमी गोष्टी. एका बाजूला चाकूधारी शंकर (अर्थात धर्मेंद्र), मध्यभागी चुरा लिया तुमने जो दिल को या सर्वकालीन लोकप्रिय गाण्यातील गिटारसह झीनत अमान व विजय अरोरा. शेजारीच झगमग लायटींगच्या स्टेजवरील इलेक्ट्रॉनिक गिटारसह तारीक. एका कोपर्‍यात काळा गॉगल घातलेला आणि हॅण्डक्लोजने सिगारेट ओढणारा अजित आणि या सगळ्या क्षेत्ररक्षणातून अगदीच कोपर्‍यात इम्तियाज. एकाच पोस्टरभर बरंच काही हे त्या काळातील वैशिष्ट्य. बरं, शाकालचा एक बूट आठ नंबरचा तर दुसरा नऊ नंबरचा. असं का याला उत्तर नाही. तशी हिंदी पिक्चर्समधील अनेक गोष्टींना उत्तरच नसतात. अगदी लहानपणीच गायलेले गाणे सही सही मोठेपणी कसे गाता येईल हे विचारायचे नाही. त्या काळात लहानपणीची अनेक गाणी मोठेपणी क्लायमॅक्सला मोठाच स्कोर करणारी ठरत. खुद्द नासिर हुसेन दिग्दर्शित ’प्यार का मौसम’मधील (1969) तुम बिन जाऊ कहा असेच तीनदा आहे आणि क्लायमॅक्सला ते कानावर पडताच नायकाला (शशी कपूर) त्याची आई (निरुपा रॉय) ओळखते. या चित्रपटात ‘यादों की बारात निकली है’ हे हरवलेले भाऊ सापडावेत याचसाठी असते, पण ते अधेमधे येते तेव्हाच हरवलेले भाऊ सापडले असते तर पिक्चर पुढे कसा गेला असता? त्या काळातील चित्रपट रसिकांना हा सगळाच फॉर्मुला भारी आवडे. कालांतराने समजले बालपणीचा तारीक लहानपणी आमिर खानने साकारलाय. तेव्हा तो आठ वर्षांचा होता. त्याला आपले काका नासिर हुसेन यांच्याबद्दल विशेष आस्था. थोडा मोठा झाल्यावर तो नासिर हुसेन यांच्याकडे ’मंझिल मंझिल’ व ’जबरदस्त’च्या वेळेस चौथ्या क्रमांकाचा सहाय्यक दिग्दर्शक होता.
आर. डी. बर्मनने ’यादों की बारात’मध्ये संगीताची भरपूर लयलूट केली. नासिर हुसेन हे आपला पहिला चित्रपट ’तुमसा नहीं देखा’ (1957)पासूनच गीत संगीत व नृत्याला भरपूर स्कोप देणारे. त्यांचा ’कांरवा’ (1971) तर त्यांच्या कारकिर्दीतील हायपॉईंट. प्रेक्षकही जाणून असत नासिर हुसेन यांचा पिक्चर म्हणजे म्युझिक भारी असणार. आपके कमरे मे कोई रहता है (पार्श्वगायक आशा भोसले, किशोरकुमार व राहुल देव बर्मन), यादों की बारात निकली है आज दिल के व्दारे (लहानपणी लता मंगेशकर, सुषमा श्रेष्ठ व पद्ममिनी कोल्हापूरे. मोठेपणी मोहम्मद रफी आणि किशोरकुमार), लेकर हम दीवाना दिल (आशा भोसले व किशोरकुमार), ओ मेरी सोनी मेरी तमन्ना (आशा भोसले व किशोरकुमार) आणि या सगळ्यावर भारी असलेले चुरा लिया है तुमने जो दिल को (आशा भोसले व मोहम्मद रफी). अशी सगळीच गाणी हिट म्हटल्यावर हीच गाणी पुन्हा पाहायची तर पिक्चरचं तिकीट काढायला हवे. चुरा लिया आजही तारुण्यात आहे, तर मग आणखी काय हवे?
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझमध्ये हा चित्रपट तब्बल पन्नास आठवडे मुक्कामाला होता. पिक्चरची जबरदस्त क्रेझ होती हे आठवतयं.
’यादों की बारात’ पुन्हा पुन्हा एन्जॉय केलेल्यांच्या डोळ्यासमोर एव्हाना अख्खं पिक्चर आले असेलच आणि आता यू ट्यूबवर पाहणारे ’या पिक्चरमध्ये काय बरे पाह्यला मिळणार आहेत’ आहे यानुसार पाहतील. तीन भाऊ लहानपणी हरवतात काय आणि लहानपणीच्या गाण्याने आता भेटतात काय, त्यातला शंकर गुन्हेगारीकडे वळतो आणि आपल्या आईपित्याच्या खूनाचा बदला काय घेतो यात काही थ्रील अथवा रोमांचकता वाटणार नाही, कारण आज डिजिटल युगात जगभरातील अनेक प्रकारचे चित्रपट पाहता येताहेत. पन्नास वर्षांपूर्वी हिंदीत मसालेदार मनोरंजक चित्रपट हाच मुख्य प्रवाहात जोरात होता. त्यात मांडणीला महत्त्व होते. थिएटरमध्ये काळोख झाल्यावर पडद्यावरच्या विश्वात मन हरवून जाणारे मनोरंजन हवे असे. त्यात ज्या दिग्दर्शकाला यश प्राप्त होई त्याचा चित्रपट पंचवीस अथवा पन्नास आठवडे कधी पूर्ण करे हे समजायचेही नाही. ’सामर्थ्य आहे मांडणीत’ असं म्हणतात ते उगीच नाही. बरं, त्यात टकलू शेट्टी या चित्रपटात डोक्यावर केस असलेला असा. ’वक्त’मधील मदन पुरीची आठवण येईल असा गेटअप. ’वक्त’मध्ये मदन पुरी राजकुमारवर चाकू उगारतो तेव्हा तो आपल्या विशिष्ट स्टाईलमध्ये बोलतो, यह बच्चो के खेलने की चीज नही…. ’यादों की बारात’मध्ये शेट्टीही असेच करतो तेव्हा धर्मेंद्र म्हणतो, सुबक जब तुम्हारा बॉस ब्रेक फास्ट के लिए टेबल पर बैठेगा तब ब्रेड को बटर लगाने काम आयेगा… कदाचित आश्चर्य वाटेल, साठच्या दशकात धर्मेंद्र सोबर व्यक्तीरेखा साकारत असतानाच (देवर, अनपढ इत्यादी चित्रपट) ओ. पी. रल्हनने ’फूल और पत्थर’( 1966)मध्ये निधड्या उघड्या छातीने धर्मेंद्र पोस्टरभर आला आणि त्याची इमेज बदलू लागली, त्यात ’यादों की बारात’ फारच मोठा सपोर्ट सिस्टीम ठरला. त्याची ही मॅन इमेज झाली आणि त्याचे डायलॉग धारधार होत गेला, आवाजही वाढत गेला.यादों की बारात निकली है आज दिल के व्दारे…. हरवले ( म्हणून) गवसले या फॉर्मुल्यावरचे पिक्चर्स केवढे तरी त्यात हा एकदम कडक नि सरस!

दिलीप ठाकूर – चित्रपट समीक्षक

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply