अलिबाग : प्रतिनिधी
जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात 1519 गावांमधील 16 हजार 534 हेक्टर क्षेत्रावरील भातशेती, भाजीपाला, आंबा बागयतींचे नुकसान झाले आहे. नवीन शासन निर्णयानुसार शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार 400 रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा एक लाख चार हजार हेक्टरवर भातलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठड्यात अतिपाऊस झाला. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहिले. काही ठिकाणी पाण्याच्या झोतामुळे जमीन खरडून गेली. बांध फुटले. उधाणाचे पाणी आले.
शेतामध्ये माती भरली. दगडगोटे आले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. एकूण क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे.
1519 गावांमधील 16 हजार 532 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. भातशेतीचे 16 हजार 394 हेक्टर, पालेभाजी 35 हेक्टर, तर फळबागांचे 36 हेक्टरवर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, यंदा हेक्टरी 20 हजार 400 रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.