Breaking News

‘कुली’ची चाळीशी…अमिताभचा आजार ते पिक्चरचे यश

26 जुलै 1982च्या दुपारनंतरची वेळ. पीटीआय व यूएनआय या वृत्तसंस्थेने ’न्यूज फ्लॅश’ म्हटलं, अमिताभ बच्चनला अपघात. एवढ्यावरून चित्र स्पष्ट होणे शक्य नव्हतेच. बातमीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते…
मनमोहन देसाई दिग्दर्शित कुली चित्रपटाच्या बंगलोर येथील बंगलोर विद्यापीठाच्या ज्ञान भारती कॅम्पसमधील सेटवर मारहाण दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याचा अभिनय करताना स्टीलच्या टेबलाचा कोपरा अमिताभ बच्चनच्या पोटात लागून तो जखमी झाला आहे, त्याला स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, असा अधिक तपशील या वृत्तसंस्थांनी दिला.
दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्रात कुठे पहिल्या पानावर, तर कुठे आतील पानावर छोटी बातमी आली. दोन तीन दिवसांत याच बातमीने वेगळे स्वरूप धारण केले. जागाही ठळक मिळू लागली.
अमिताभचा अपघाती आजार बळावला असून त्याला मुंबईत आणण्यात येत आहे. मुंबईत त्याच्या उंचीच्या (आडव्या साईजची) रुग्णवाहिकेसाठी त्याचा सेक्रेटरी शीतल जैन याने शोध घेतला असता गिरगाव डॉ. भडकमकर मार्गावरील शिवसेना शाखा क्रमांक 19 यांच्याकडे ती आहे असे समजले. याच रुग्णवाहिकेतून अमिताभला दक्षिण मुंबईतील डॉ. भुलाभाई देसाई मार्गावरील (वॉर्डन रोड) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवस अमिताभच्या तब्येतीबद्दलची माहिती देणारे इस्पितळाचे मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध होत राहिले. जया बच्चनसह सगळे कुटुंबीय अमिताभची विचारपूस करायला येत होते.
मुंबईत तेव्हा प्रसिद्ध होत असलेल्या इंग्रजी सायंदैनिकात हे सगळेच पहिल्याच पानावर सविस्तर प्रसिद्ध होत राहिले. हळूहळू चित्रपट रसिकांत अमिताभच्या तब्येतीविषयी चर्चा वाढत गेली.
2 ऑगस्ट 1982. अमिताभवर अतिशय महत्त्वपूर्ण व अवघड शस्त्रक्रिया. ती यशस्वी व्हावी म्हणून देशभरातील त्याच्या असंख्य चाहत्यांकडून देवळांत, मशिदीत, चर्चमध्ये, गुरुद्वारात पूजा. या सदिच्छांनी अमिताभचा जणू पुनर्जन्म झाला. शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यावर आता आणखी काही दिवस त्याला इस्पितळात उपचार घ्यावे लागणार हे स्पष्ट होते.
आता प्रत्येक दिवसासोबत अमिताभच्या आजारावरून माध्यमातून चर्चा वाढत होती. (तेव्हा मुद्रित माध्यमे होते. दूरदर्शनवर फक्त संध्याकाळी साडेसात वाजता बातम्या असत. महत्त्वाचे म्हणजे, ’पेपरात आलंय म्हणजे खरं ’ अशी सामाजिक विश्वासार्हता होती.)  रेखा बुरख्यात येऊन अमिताभला बघून गेली असंही गॉसिप्स रंगले. त्यात आश्चर्य ते काय?
24 सप्टेंबर 1982. अमिताभला इस्पितळातून डिस्चार्ज. महत्त्वाची बातमी म्हणून आम्ही सिनेपत्रकार व फोटोग्राफर्सची ब्रीच कॅण्डीबाहेर मोठ्याच प्रमाणावर गर्दी. त्यात अमिताभच्या फॅन्सचीही विलक्षण गर्दी. अनेकांच्या चेहर्‍यावर अमिताभ आता कसा आहे वा दिसतोय याची उत्सुकता आणि थोडी चिंतादेखील. अतिशय महत्त्वाचा आणि हृद्य क्षण. बराच वेळ वाट पाहिल्यावर बाहेर येत असलेला अमिताभ तब्येतीने हटलेला, चेहरा उतरलेला, नजर हरवलेली असा. काहीं फॅन्सना अजिबात राहवले नाही. काहीजण त्याला बिलगले. गर्दीतून वाट काढत पुढे जात असलेला अमिताभ म्हणाला, मै तो चला गया था, आप की दुवाओ से वापस आया… वातावरणात व्याकुळता, संवेदनशीलता.
एव्हाना देश-विदेशात अमिताभच्या तब्येतीत सकारात्मक सुधारणा व्हावी म्हणून सर्व धर्मात प्रार्थना केली जात होती. सामाजिक, सांस्कृतिक वातावरण ढवळून निघाले होते. चित्रपट व समाज या नात्याचा हा एक वेगळाच पैलू होता. आपल्या देशात चित्रपट खोलवर रूजलाय, अनेकांच्या भावविश्वाचा तो भाग आहे याचाच हा प्रत्यय होता.
काही महिन्यांनी पूर्ण बरा झाल्यावर अमिताभने प्रत्येक रविवारी संध्याकाळी एक तास जुहूच्या आपल्या प्रतीक्षा बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून आपल्या चाहत्यांना दर्शन देणे सुरू केले. हळूहळू या ’अमिताभ दर्शना’साठी गर्दी वाढू लागली. देशभरातून ’अमिताभ भक्त’ येऊ लागले. अमिताभचा आजार हा जणू देशभरातील महत्त्वाचा विषय झाला.
7 जानेवारी 1983. साकी नाकाजवळील चांदिवली स्टुडिओत ’कुली’च्या शूटिंगनेच अमिताभ पुन्हा कॅमेरासमोर येत आपली ’सेकंड इनिंग’ सुरू करीत असल्याचे मनमोहन देसाई यांच्या निर्मिती संस्थेकडून आमंत्रण हाती आहे.
ज्या मारहाण दृश्यावर शूटिंग थांबले होते त्याच दृश्यापासून शूटिंग सुरु होत होते. अतिशय महत्त्वाचा क्षण असल्याने आम्ही सिनेपत्रकार व फोटोग्राफर्सची भरपूर गर्दी. रति अग्निहोत्रीची विशेष उपस्थिती होती. चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरही हजर. त्यात उल्लेखनीय नाव दिग्दर्शक प्रकाश मेहरा. त्याचं नि मनमोहन देसाई यांच्यातील सततचे वाद गॉसिप्स मॅगझिनना हुकमी खुराक म्हणून त्याचं येणे महत्त्वाचे.
दोन तीन चित्रीकरण सत्रात काही महिन्यांनी ’कुली’चे शूटिंग संपले. आनंद बक्षी यांची गीते व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत असलेली ध्वनिमुद्रिका आणि ध्वनीफित प्रकाशित झाली. अमिताभसाठी पहिल्यांदाच शब्बीरकुमार याचा प्लेबॅक वापरल्याने अमिताभ भक्त नाराज. सारी दुनिया का बोझ हम उठाते है (शब्बीरकुमार) , अ‍ॅक्सिडंट हो गया (आशा भोसले व शब्बीरकुमार), लंबूजी लंबूजी (शब्बीरकुमार व शैलेंद्रसिंग) ही गाणी अमिताभ कृपेने चक्क लोकप्रिय झाली. लोकप्रिय स्टारची प्रत्येक गोष्ट होतेच.
2 डिसेंबर 1983. ’कुली’ प्रदर्शित झाला. (चक्क चाळीस वर्ष झालीदेखील) आम्हा सिनेसमिक्षकांना पहिल्याच दिवसाची सेकंड शोची हाऊसफुल्ल थेटरात पब्लिकसोबत पिक्चर एन्जॉय करा हेच एक प्रकारे सांगण्यात आले.
सुरुवातीच्या काही स्लाईड्स, मग जाहिरातपट व भारतीय समाचार चित्र संपले आणि सेन्सॉर सर्टिफिकेटवर दिसले, बावीस रिळे. खच्चून भरलेल्या थिएटरमध्ये अक्षरश: प्रचंड टाळ्या शिट्ट्या. आपण अगोदर प्रेक्षक आहोत मग समिक्षक आहोत याचे भान असल्यानेच मीदेखील टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतोय हे पाहून शेजारीच बसलेल्या खडूस समिक्षकाने चेहरा विचित्र केला.
पहिल्याच दृश्यापासून मनजींच्या योगायोगाने भरलेला मसालेदार मनोरंजक चित्रपट. हेलिकॉप्टरमधून फिरणारा क्रूरकर्मा खलनायक झफर खान (कादर खान) एका गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर येतो तेव्हा त्याला समजते त्याला अतिशय आवडलेल्या सलमाचे (वहिदा रेहमान) अस्लम खानशी (सत्येन कप्पू) लग्न होऊन तिला इक्बाल खान हा मुलगा आहे. तरीही त्याची पाशवी वृत्ती शांत बसत नाही. अस्लम खान कुटुंबाचे व नाथू (निळू फुले) व त्याच्या पत्नीशी (आशालता बावगावकर) चांगले नाते. ते महाराष्ट्रीयन. त्यांचा मुलगा अगदी लहान आहे. झफर खान धरणावर काम करत असलेल्या अस्लम खानला ठार मारतो तेव्हा फुटलेल्या धरणातील पाणी गावात शिरून हाहाकार उडतो. अख्खं गाव वाहून जाते. सलमा त्या पाण्यात वाहून जाताना तिच्या मेंदूला मार बसून तिची स्मृती जाते. नाथूची पत्नी व मुलगा वाहून जातो. नाथूला इक्बाल सापडतो, तर झफर स्मृती गेलेल्या सलमाला घेऊन दुसर्‍या शहरात निघतो. तेव्हा रेल्वे स्टेशनवर पेपर विकणारा इक्बाल तिला ओळखतो, पण ती त्याला अजिबात ओळखत नाही. मध्ये काही वर्ष जातात. इक्बाल मोठा होतो आणि रेल्वे स्टेशनवरचा ’कुली’ (अमिताभ बच्चन) बनतो…
कादर खानने लिहिलेल्या या पटकथेत सतत अशीच (धक्कादायक?) वळणे येत जातात. कॅमेरामन पीटर परेरा व संकलक हृषिकेश मुखर्जी हे मान्यवर आपली जबाबदारी चोख  बजावतात.  इक्बाल व ज्युली डिसोझाचे (रति अग्निहोत्री) व सनी (ॠषि कपूर) व दीपा अय्यंगार (शोमा आनंद) अशी दोन प्रेमप्रकरणे. इक्बाल व सनीची मैत्री. यातच विकी पुरी (सुरेश ओबेरॉय), जॉनी डीकॉस्टा (अमरिश पुरी), ओम पुरी (ओम शिवपुरी… हे नामकरण ग्रेटच), गोगा (गोगा कपूर), दीपाचे वडील (मुकरी), बॉब (पुनीत इस्सार) अशा अनेक व्यक्तिरेखा.
…अशातच इक्बाल खान व बॉब यांच्या मारधाडीचे दृश्य सुरू होताच मनात आपोआपच येते याच फायटींगच्या वेळेस अमिताभच्या पोटात टेबलाचा कोपरा लागून तो जीवघेण्या आजारातून बचावला. आणि तेवढ्यात तो प्रसंग फ्रीझ होतो. स्लो मोशनमध्ये फायटिंग सुरू होते आणि पडद्यावर येतं, या दृश्याच्या वेळेस अमिताभ जखमी झाला, ते वाचूनच चित्रपटगृहात एक प्रकारची शांतता पसरते आणि ते दृश्य पुन्हा वेगाने दाखवले जाताच अख्ख्या थिएटरमध्ये प्रचंड टाळ्या शिट्ट्यांचा पाऊल पडतो. हे अमिताभवरचे प्रेम असते. अशा पध्दतीने एकादे दृश्य फ्रीझ करणे योग्य आहे का यावर काहींनी प्रश्न निर्माण केला. तोपर्यंत पिक्चर असं काही सुपर हिट झाला की अलंकार थिएटरमध्येच पन्नास आठवड्यांचा खणखणीत मुक्काम केला. अनेक शहरांत पिक्चरने ज्युबिली हिट यश संपादले.
चित्रपटाच्या क्लायमॅक्सला झफर खानच्या बंदूकीच्या गोळीने इक्बालचा मृत्यू होतो असा मूळ पटकथेत असलेला शेवट रसिकांना पटणार नाही असे मानतच तो बदलला गेला.
मनमोहन देसाई आमचे गिरगावकर (मी खोताची वाडीतील, ते खेतवाडीतील, चालत गेलो तरी सहाव्या मिनिटावर त्यांचे प्रताप निवासमधील घर) आणि माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक. म्हणून ’कुली’चं परीक्षण लिहिताना ’मनोरंजनाचा फॅक्टर’ महत्त्वाचा मानला.
’कुली’ रिलीज झाल्यावर अमिताभच्या आजाराची गोष्ट हळूहळू मागे पडत गेली तरी त्या आठवणीच्या जखमा आजही कायम आहेत.
मनमोहन देसाई दिग्दर्शित ’गंगा जमुना सरस्वती’च्या सेटवर पुनीत इस्सारच्या मुलाखतीचा योग आला असता त्याचा ’कुली’च्या सेटवर अमिताभच्या पोटात बसलेल्या ठोशाचा विषय निघणे स्वाभाविक होतेच. पुनीत इस्सार मला सांगू लागला, ती गोष्ट घडल्यानंतर बरेच दिवस मी अस्वस्थ होतो. मला काहीच सुचत नव्हते. तसा घाबरतच मी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अमितजींना भेटायला गेलो. तेव्हा ते मला म्हणाले, यात तुझी काहीच चूक नाही. हे केवळ दुर्दैवाने घडले. चूकन झालयं. त्यात इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. प्रकाश मेहरा यांच्या राकेशकुमार दिग्दर्शित ’खून पसिना’च्या एका मारहाण दृश्यात विनोद खन्नाच्या हाताला असाच मार बसला तेव्हाही मी असाच अस्वस्थ झालो होतो. विनोद खन्नाने तेव्हा माझी अशीच समजूत काढल्यावर मला हलकं वाटलं. तूही तसेच समज असे अमिताभ म्हणाल्याचे पुनीत इस्सार मला म्हणाला.
असो. माणूस म्हटला की कमी अधिक दुखणी खुपणी असतातच. त्याला सेलिब्रिटीजही अपवाद नाहीत, पण सगळेच कलाकार आपणही माणूस आहोत हे चलतीच्या काळात लक्षात ठेवतात का हे मात्र सांगता येत नाही…
अमिताभ बच्चनचे आजारपण सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम  क्षेत्र अक्षरश: ढवळून काढणारे. जनसामान्यात अस्वस्थता निर्माण करणारे. म्हणूनच त्याचा फ्लॅशबॅक हा असा, ’कुली’च्या सेटपासून त्याच्या यशापर्यंतचा प्रवास…

  – दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply