(हुस्न के लाखों रंग…)
पद्मा खन्ना पंचाहत्तर वर्षांची झाली (जन्म 10 मार्च 1949) असं मी म्हणेपर्यंत रसिकांच्या एका पिढीच्या डोळ्यांसमोर एव्हाना विजय आनंद दिग्दर्शित ’हुस्न के लाखों रंग’ हे तिने जॉनी मेरा नाम (1970) या धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपटात पडद्यावर साकारलेले गाणे आले असेल. दारूमध्ये अखंड बुडालेल्या प्रेमनाथची वासनेने वखवखलेली नजर आणि त्याच्या मागणीनुसार पद्मा खन्नाने आपल्या अंगावरील एकेक वस्त्र उतरत केलेले मोहक मादक नृत्य हे त्या काळात चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक आणि मीडियात विलक्षण गाजले. मुख्य प्रवाहातील चित्रपटात असं सनसनाटी नृत्य हाच एक मोठा सांस्कृतिक धक्का होता. (आज ओटीटीच्या युगात ते धक्के जणू नाहीसे झालेत) तेव्हा सेन्सॉरने कसं संमत केले यावर प्रसारमाध्यमांतून केवढे तरी ताशेरे ओढले गेले. अशातच पिक्चर हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असतानाच ते चित्रपटातून चक्क काढले गेले म्हणून केवढा ओरडा. हे प्रकरण वेगळेच होते. नृत्य उत्तेजक आहेत अशी ओरड वाढल्याने सेन्सॉरने चक्क फेरतपासणीसाठी मागवून घेतले. चित्रपट सेन्सॉर करतानाच सेन्सॉर या गाण्यावर प्रक्षोभक असा शेरा मारला होताच आणि काही कट्सने ते सुटले होते, पण आता हे गाणे सेन्सॉरने पुन्हा पहायचे ठरवताच जॉनीचे निर्माते त्रिमूर्ती फिल्मचे गुलशन रॉय आणि देव आनंद लगोलग कोर्टात गेले आणि स्थगिती मिळवली. तात्पर्य आजही ते गाणे चित्रपटात कायम आहे. पद्मा खन्ना ’हॉट केक’ म्हणून गॉसिप्स मॅगझिनमधून गाजत राहिली. चित्रपटातील आपल्या प्रियकराला (रंधवा) खलनायकाने धमकावले आणि त्याच्या बॉडीगार्डसनी त्याला पकडून ठेवलंय अशा वेळी पद्मा खन्ना हे गीत नृत्य साकारतेय. चित्रपटाच्या जगात ’यश हेच चलनी नाणे’ या नियमानुसार पिक्चर हिट आहेत, तर त्यातील लहान मोठ्या कलाकारांना त्याच स्वरूपातील भूमिका मिळत राहणे हा येथील पूर्वीचा अलिखित नियम. (आता परिस्थितीत बराच बदल झाला आहे तो फारच ’दिसतोय’.) पद्मा खन्नाच्या नशिबी मग मोठ्याच प्रमाणावर अशाच भूमिका आल्या. खलनायकाची गर्लफ्रेंड, खलनायिका, व्हॅम्प अशा भूमिका तिने केल्या. तेव्हा तिची स्पर्धा प्रामुख्याने बिंदूशी होती. आशू, फरियालही अशा भूमिका करीत असे. रंगबिरंगी कॉन्टॅक्स लेन्स, भडक नि शॉर्ट्स कपडे, कधी एखादा मादक डान्स याच चाकोरीत या भूमिका अडकल्या. अधूनमधून एकादी कव्वाली वा मुजरा साकारायला मिळे. अशा पद्मा खन्नाला पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा. सध्या ती अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये आपल्या नेहा व अक्षर या दोन वयात आलेल्या मुलांसोबत राहतेय आणि न्यूयॉर्क येथे तिने खपवळरपळलर डान्स अकादमीचे स्थापना केली असून त्यात शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देत आहे. हे तिच्या कारकिर्दीचे दुसरे टोक म्हणता येईल आणि हे चांगलेच आहे, कौतुकास्पद आहे. तिचा जन्म बिहारमधील पाटणा येथील एका सर्वसाधारण कुटुंबातील. वयाच्या सातव्या वर्षापासून ती कथक नृत्य शिकू लागली. मुंबईत येऊन बिरजू महाराज यांच्याकडूनही तिने नृत्याचे प्रशिक्षण घेतले. तेच तिचे वैशिष्ट्य ठरले. तेथेच वैजयंतीमाला, पद्मिनी यांचे तिच्या मेहनत व गुणवत्तेकडे लक्ष गेले आणि त्यांनी पद्मा खन्नाला चित्रपटातून अभिनय करण्याचा सल्ला दिला. हे सोपे काम नव्हतेच. सुरुवात तिने बिहारमध्येच निर्माण झालेला पहिला भोजपुरी चित्रपट गंगा मैया तोहे पियरी चढाईयो’ (1962)मध्ये पद्मा खन्नाला भूमिका मिळाली. साठच्या दशकात काही भोजपुरी तर काही हिंदी चित्रपटातून भूमिका साकारण्यास सुरुवात केली. भोजपुरी चित्रपटात नायिका तर हिंदी चित्रपटात सहनायिका, छोटीशी भूमिका अशी ही वाटचाल होती. बिदेसिया, बालम परदेसीया, धरती मैया, भैया दूज, ये तुलसी मैया इत्यादी भोजपुरी चित्रपटातून तिने भूमिका साकारल्या. हिंदीत हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’बिवी और मकान’ (1966)पासून सुरुवात केली. साज और सनम, परदे के पीछे, सीमा, जिंदगी अशा काही चित्रपटात भूमिका साकारत असतानाच तिला जॉनी मेरा नाम मिळाला. एका बाजूला पहावे तर मोठेच खणखणीत यश, दुसर्या बाजूला पहावे तर त्याच रंगढंगातील चौकटीतील भूमिका. एकदा का व्यावसायिक कलाकार म्हणून काम सुरू केले की पर्याय नसतो. एक चौकट ठरत जाते. चित्रपटासाठी नृत्य करताना त्यात शास्त्रीय नृत्यासाठीची संधी तशी क्वचितच आणि व्हॅम्प म्हटलं की क्लब डान्स, हॉटेल डान्स असा फंडा जास्त. त्यात उत्तेजक भावना ही थीमची गरज. व्यावसायिक कलाकार म्हणून हे करीतच वाटचाल करावी लागते. अशातच पद्मा खन्नाला एक चांगली आणि लक्षवेधक भूमिका मिळाली. चित्रपट होता राजश्री प्रॉडक्सन्स निर्मित सौदागर (1973). सुधेन्द्रू रॉय दिग्दर्शित या चित्रपटात नूतन, अमिताभ बच्चन व पद्मा खन्ना यांच्या प्रमुख भूमिका. हा चित्रपट 1972 साली सेटवर गेला तेव्हा अमिताभचा पडता काळच सुरू होता. ’बॉम्बे टू गोवा’च्या यशाचे श्रेय मेहमूद व किशोरकुमारकडे गेले. सेटवर प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’जंजीर’ (1973 साली प्रदर्शित), ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’अभिमान’ (1973) व ’नमक हराम’ (1973), नरेंद्र बेदी दिग्दर्शित ’बेनाम’ (1974 साली प्रदर्शित) आणि सुधेन्द्रु रॉय दिग्दर्शित ’सौदागर’ होते. यातील ’जंजीर’ सुपर हिट होताना अमिताभ बच्चनला सूडनायक अर्थात अॅन्ग्री यंग मॅन अशी इमेज घट्ट चिटकली. ’सौदागर’ त्याचा तसा नवप्रवाहाच्या पठडीतील चित्रपट. अशी गुळाचा पाक करून विक्री करीत सुखात जगत असलेल्या दाम्पत्यातील पती मोती (अमिताभ) नटखट, चुळबुळी फूलबानोच्या (पद्मा खन्ना) प्रेमात वेडापिसा होतो आणि त्यातच तो निर्णय घेतो आपली पत्नी महजबी (नूतन) हिला घटस्फोट देऊन फूलबानोशी लग्न करायचे. फूलबानोला चांगला गुळ कसा बनवायचा याचे ज्ञान नसते आणि त्यात तिला फारसा रसही नसतो. याचा फटका मोतीच्या व्यवसायाला बसतो आणि त्याची पुरती घसरण होते, फजिती होते. आता मोती फूलबानोला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतो… अमिताभचा एक वेगळा चित्रपट म्हणून ’सौदागर’ ओळखला जातो, पण चित्रपटाला रसिकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने पद्मा खन्नालाही आपली प्रतिमा बदलता आली नाही आणि मग तिच्या रुळलेल्या अशा खलनायिकेच्या भूमिकेत ती काम करीत राहिली. अशाने तिच्या चित्रपटांची संख्या वाढत राहिली इतकीच. दास्तान, रामपूर का लक्ष्मण, दाग, जोशीला, लोफर, जान ए वफा, कश्मकश, हेरा फेरी, पापी, अनुभव, घरसंसार वगैरे अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारली. तिची भूमिका असलेला यार मेरी जिंदगी हा चित्रपट 1972 साली सेटवर गेला, पण बराच काळ रखडत रखडत 2008 साली पडद्यावर आला. विशेष उल्लेखनीय गोष्ट यात अमिताभ बच्चन व शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिका असल्या तरी त्या फक्त आणि फक्त अगदी सुरुवातीला त्यांचे जेवढे शूटिंग झाले तेवढ्याच आहेत. खुद्द त्यांना तरी हा चित्रपट आठवत असेल का?
पद्मा खन्नाने पंजाबी (शेर पुत्तर), गुजराती, उडिया या भाषेतील चित्रपटांत भूमिका साकारल्या. तेलगूत तिने एनटीआरसोबत ऊशीेववरीरर्ज्ञीर्श्री या चित्रपटात काम केले. मराठीतही कमलाकर तोरणे दिग्दर्शित देवता, हेम हिरा चित्र निर्मित माफीचा साक्षीदार या चित्रपटात तिची नृत्य पहायला मिळतात. ’देवता’मधील रवींद्र महाजनी व तिच्यावरचे खेळ कुणाला दैवाचा कळला हे गाणे सर्वकालीन लोकप्रिय आहे. पद्मा खन्नाने छोट्या पडद्यावरही लक्षवेधक कामगिरी केली. रामानंद सागर यांच्या सागर आर्ट्स निर्मित रामायण मालिकेत कैकयी ही व्यक्तीरेखा साकारली. यातील कोपभवन दृश्याच्या चित्रीकरणात पद्मा खन्ना अशी व इतकी एकरूप झाली की तिच्या डोळ्यांत अश्रू आले आणि तिचे अश्रू पाहून रामानंद सागर यांनाही राहवले नाही. त्यांच्याही डोळ्यांत अश्रू आले. पहेचान, मीठा झहर या मालिकेतूनही तिने काम केले. पद्मा खन्नाच्या काही विशेष गोष्टी सांगायलाच हव्या. आपल्या दीर्घकालीन अनुभवातून तिने चक्क चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि 2004 साली ’नाहीर हुटील जवा’ या भोजपुरी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सतत क्रियाशील रहावे हा तिचा बाणा त्यातून अधोरेखित होतो. कमाल अमरोही दिग्दर्शित पाकिजा (1972) निर्मितीवस्थेत बरीच वर्ष असतानाच मीनाकुमारीची तब्येत बिघडली होती. तिला नृत्य करणे अवघड जात होते म्हणून चलो दिलदार चलो, तीर नजर देखेंगे या गाण्यात लॉन्ग शॉट्सना पद्मा खन्नाने नृत्य केलेय. नृत्य दिग्दर्शक व छायाचित्रणकार यांनाही याचे श्रेय. आजही ’पाकिजा’ची गाणी लोकप्रिय असून पुन्हा पुन्हा पाहिली जाताहेत. आपली कारकीर्द छान चालली असतानाच पद्मा खन्नाने निर्माते जगदीश सदाना यांच्याशी 1986 साली लग्न केले. सदाना निर्मित ’शेरदिल’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेण्याचे त्या काळातील ’स्टार पीव्हीआरओ’ बनी रुबैन यांनी मला सुचवल्यानुसार मी खार जिमखानाजवळील जगदीश सदाना यांच्या घरी गेलो. अतिशय प्रशस्त अशा इमारतीत पोहचलो आणि सदाना यांच्या घराची बेल वाजवली. काही मिनिटातच दरवाजा उघडला तो चक्क पद्मा खन्नाने. माझ्यासाठी हा आश्चर्याचा खूपच मोठा सुखद धक्का होता. सदानापेक्षा पद्मा खन्नाचीच मुलाखत घ्यावी असे वाटले. आम्ही तिघे एकत्र चहा पिता पिता काही गप्पा झाल्या. त्यात पद्मा खन्ना आपल्या एकूणच वाटचालीबद्दल पूर्ण समाधानी असल्याचे लक्षात आले. हे जास्त महत्त्वाचे. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीची अनेक वैशिष्ट्तांतील एक पद्मा खन्नाची कारकीर्द. काळ पुढे पुढे सरकत असतो आणि अनेक कलाकार मागील पिढीचे म्हणून ओळखले जातात. तरी त्यांची रूपेरी पडद्यावरील कामगिरी त्याचे वैशिष्ट्य व अस्तित्व पुढील पिढीतील रसिकांसमोर आणत असते, पद्मा खन्ना त्यातीलच एक.
- दिलीप ठाकूर चित्रपट समीक्षक