पनवेल : बातमीदार
एसटीमधून प्रवास करताना दारू पिणार्या तरुणाला हटकणार्या पोलीस हवालदार अरविंद पाटील यांना या तरुणाने व त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण करून पलायन केल्याची घटना रविवारी रात्री पनवेल येथे घडली. या मारहाणीत पाटील हे जबर जखमी झाले असून त्यांना पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी दोघा अज्ञात मारेकर्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेत जखमी झालेले पोलीस हवालदार अरविंद पाटील (53) हे मुंबई पोलीस दलात नायगाव येथे कार्यरत असून ते रविवारी रात्री अलिबाग-पनवेल एसटी बसने परतत होते. रात्री 9च्या सुमारास अरविंद यांच्या शेजारी बसलेल्या तरुणाने बिअर पिण्यास सुरुवात केल्याने पाटील यांनी त्याला हटकले, मात्र या तरुणाने दुर्लक्ष करत बिअरचा आणखी एक कॅन उघडला. त्यामुळे बिअरचा फेस अरविंद पाटील यांच्या अंगावर उडाल्याने पाटील आणि या तरुणात वाद झाला. या तरुणाने पाटील यांना बघून घेण्याची धमकी दिली. या वेळी वाद वाढू नये म्हणून पाटील यांनी नमते घेऊन ते झोपी गेले. या दरम्यान या तरुणाने साथीदाराला पळस्पे येथील दत्त स्नॅकजवळ फोन करून बोलावून घेतले. रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ही एसटी बस पळस्पे येथे आली असताना साथीदारांनी बस अडवून बसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आरोपी तरुणाने व त्याच्या साथीदारांनी अरविंद पाटील यांना शिवीगाळ करून त्यांना बेदम मारहाण केली. या वेळी अन्य प्रवाशांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनी कठीण वस्तूने पाटील यांना मारहाण करून त्यांना जखमी करून तेथून पळ काढला. पाटील यांच्यावर पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.