
पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग, इंग्रजी माध्यमातील मराळ, सौ. कुलकर्णी, सौ. पाटील आदी शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कागदी आकाशकंदिल, तोरण तसेच लामणदिवा बनविण्याची आभासी कार्यशाळा शनिवारी (दि. 30) आयोजित केली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारित विद्यार्थ्यांच्या मोकळ्या वेळेचा वापर मोबाइल गेम्सऐवजी कलाकौशल्य विकसित करण्याच्या हेतूने विद्यालयाच्या शिक्षकांनीच घर सजावटीची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत पर्यावरण स्नेही आकाशकंदिल, तोरण, तसेच लामणदिवा बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून आकर्षक सजावटीचे आकाशकंदील, तोरण तसेच लामणदिवे बनविले आणि उत्साहाने सहभागी झाले. कार्यशाळेच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी शिक्षकांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना विविध कलाकौशल्य संपादन करण्यासाठी प्रोत्साहन देऊन पालकांचे आभार मानले आणि सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. शालेय अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्य तसेच सुप्त गुणांना वाव देणारी ही पर्यावरण स्नेही कार्यशाळा प्रेरक आहे, असे मत पालकांनी व्यक्त केले.