Breaking News

आरोग्यवान महाराष्ट्र

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण खाली आणण्यात महाराष्ट्राला यापूर्वीच यश मिळाले होते. एक हजार नवजात मुलांमध्ये जास्तीत जास्त 25 बालमृत्यू असे हे प्रमाण असून राज्याची यासंदर्भातील कामगिरी उत्तम आहे. नवजात शिशुंच्या मृत्यूच्या संदर्भात 1000 नवजात बालकांमध्ये जास्तीत जास्त 12 मृत्यू अशी मर्यादा जागतिक आरोग्य संघटनेकडून घातली गेली आहे. महाराष्ट्र हे लक्ष्य गाठण्याच्या समीप आहे. आरोग्याशी निगडित वेगवेगळ्या बाबींच्या निकषांवर देशभरातील तमाम राज्यांची पाहणी केली असता सर्वात आरोग्यवान अशा मोठ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा लागला आहे. यापूर्वी अशीच पाहणी साली झाली होती, तेव्हा महाराष्ट्र या यादीत सहाव्या क्रमांकावर होते. अल्पकाळात आरोग्याच्या क्षेत्रात राज्याने दाखवलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असून त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करायला हवे. नवजात शिशुंचे, 5 वर्षांखालील बालकांचे आणि बाळंतपणादरम्यान होणार्‍या माता मृत्यूचे प्रमाण खाली आणल्यामुळे आरोग्यवान राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. नीती आयोगाने दुसर्‍यांदा राज्यांची ही अशी यादी जाहीर केली. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या यादीत 21 मोठ्या राज्यांची कामगिरी विचारात घेण्यात आली आहे. राज्याची 2017-18 मधील विविध निकषांवरील कामगिरी या पाहणीत जोखली गेली. 2017-18च्या एकंदर कामगिरी निर्देशांकात महाराष्ट्राने 66.99 टक्के कमावले असून केरळ आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांची कामगिरी या पाहणीत महाराष्ट्रापेक्षाही सरस ठरली आहे. यापूर्वी 2015-16 साली प्रथमच अशी पाहणी करण्यात आली होती. तेव्हा महाराष्ट्र 61.07 टक्के कमावून सहाव्या क्रमांकावर होता. 2017-18साठी 63.99 टक्के कमावून महाराष्ट्राने पहिल्या तीन आरोग्यवान राज्यांत स्थान पटकावले असल्याचे ट्वीट मंगळवारी स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आरोग्याशी संबंधित 23 निकषांवर राज्यांची कामगिरी यात जोखली गेली. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमानुसार हे निकष ठरवण्यात आले आहेत. बालमृत्यू तसेच जननीमृत्यूचे प्रमाण खाली आणण्याबरोबरच एचआयव्हीग्रस्त आणि टीबीच्या रुग्णांना योग्य औषधोपचार उपलब्ध करून देण्यातही महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली आहे. आरोग्य क्षेत्रात राज्याने उत्तमोत्तम सुविधा पुरवल्याने, सुयोग्य निर्णय वेळोवेळी घेतल्याने व राज्यभरातील आरोग्यक्षेत्रातील डॉक्टर व अन्य कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांतून हे लक्ष्य गाठणे शक्य झाले आहे. एक वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचे तसेच स्तनपान करणार्‍या मातांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यापर्यंत खाली आणण्याकरिताही राज्यातील आरोग्ययंत्रणा प्रयत्नशील आहे. घराऐवजी इस्पितळात बाळंतपण पार पाडले जावे याकरिताही राज्याने खूप जागरूकता निर्माण केली असून 2017-18 मध्ये हे प्रमाण 89.9 टक्के इतके सुधारल्याचे पाहणीत नोंदले गेले. याआधीच्या पाहणीत म्हणजे 2015-16मध्ये हे प्रमाण 85.3 टक्के इतके नोंदले गेले होते. काही वर्षांपूर्वी मेळघाटातील कुपोषणाच्या बळींमुळे राज्याच्या प्रगतीशील प्रतिमेला तडा गेला होता. अथक प्रयत्नांतून कुपोषण बळींची संख्या खाली आणण्यातही राज्याला यश आले आहे. अर्थात महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणातून पुढे जाणारी डॉक्टर मंडळी आज जगभरात नावाजली जात असताना या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक पहिला असायलाही हरकत नाही.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply