पनवेल ः पनवेल रेल्वे इलेक्ट्रीक खांबाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. त्या व्यक्तीचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, उंची 5 फूट 2 इंच, डोक्यावरील केस काळे बारीक, रंग सावळा, चेहरा उभट असून अंगात पांढर्या रंगाची हाफ पॅण्ट घातली आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक एस. आर. उगलमुगले यांच्याशी संपर्क साधावा.
वाहनाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू
पनवेल ः पनवेलजवळील चिंचपाडा ते वडघर रस्त्यावरून जाणार्या मारुती गाडीच्या धडकेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या इसमाच्या नातेवाइकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. त्या व्यक्तीचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, रंग सावळा, चेहरा उभट, बारीक मिशी, दाढी कापलेली असून अंगात पिवळ्या निळसर रंगाचे पट्ट्याचे शर्ट व निळसर जीन्स पॅण्ट घातली आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक एन. एल. बेलदार यांच्याशी संपर्क साधावा.
फसवणूकप्रकरणी ग्रामसेवकास अटक
पनवेल ः फसवणुकीप्रकरणी एका ग्रामसेवकाला पनवेल पोलिसांनी बुधवारी सकाळी पनवेल परिसरातून अटक केली. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खैरवाडी येथील ग्रामसेवक संदीप साळवी यांच्यावर 2018साली सीआर नं. 33अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते पोलिसांपासून लपत होते. अखेरीस बुधवारी ते पनवेलमध्ये येणार असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि. अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक झांझुर्णे व त्यांच्या पथकाला मिळताच सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.