Breaking News

मोहीम जलसंवर्धनाची

देशाच्या कुठल्याही भागात शहरीकरण करताना आता हरित समतोल केंद्रस्थानी ठेवण्याचे भान बाळगायला हवे आहे. विहिरी, कुंडे आणि तळी जपण्याच्या पारंपरिक पद्धतींकडे पुन्हा एकदा वळावे लागणार आहे. जलसंवर्धनाला जनआंदोलनाचे रूप द्यावे लागेल, असे आवाहन खुद्द मोदीजींनीच केले. याहून अधिक चांगली सुरुवात त्यास लाभली नसती. बदलत्या हवामानाने आपले रंग दाखवायला केव्हाचीच सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य गेली काही वर्षे सातत्याने दुष्काळात होरपळून निघते आहे. राज्याच्या अनेक भागांत टोकाची पाणीटंचाई जणू जगण्याचा भागच बनत चालली आहे. यंदा तर मान्सूनने मुंबई आणि आसपासच्या परिसरात अवतरण्यास देखील जवळपास पंधरवडाभराचा उशीर केला. हे सारेच बदल आणि देशभर जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष सर्व स्तरावर या समस्येची गांभीर्याने दखल घेण्यास भाग पाडणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांनंतर आपल्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे दुसरे पर्व सुरू करताना जलसंवर्धनाचा विषय त्यातून प्राधान्याने मांडला. यातच या प्रश्नाभोवतीची परिस्थिती किती तातडीच्या कार्यवाहीची मागणी करणारी आहे हे स्पष्ट होते. मोदीजींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला सुयोग्य प्राधान्य देत जनतेला या संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील प्रयासांत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोदीजींच्या लोकप्रियतेतून किती मोठा आणि व्यापक बदल घडून येऊ शकतो हे आपण स्वच्छता अभियानाच्या वेळेस अनुभवले. तसाच परिणाम आणि प्रभाव मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वात जलसंवर्धनाच्या संदर्भात दिसून आल्यास निश्चितच पाणी प्रश्नावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने ते खूपच दूरगामी आणि सकारात्मक बदल घडवणारे ठरू शकेल. मोदीजींनी देशातील सर्व जलसाठ्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे आवाहन लोकांना ‘मन की बात’मधून केले आहे. जनभागीदारी अर्थात लोकांच्या सहभागावर मोदीजींनी दिलेला भर अत्यावश्यकच आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवल्याखेरीज परिस्थिती आटोक्यात येणार नाही. पावसाची अनिश्चितता, वारंवार टोकाच्या हवामानाचा सामना करणे भाग पडणे हे सारे लक्षात घेता भारतासारख्या देशाला आपली शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवायची असल्यास नदीपात्रांतील पाणीसाठा, तसेच भूजलसाठ्याचे संवर्धन करण्याला पर्याय नाही. देशाच्या अनेक भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, देशभरात पडणार्‍या पावसापैकी निव्वळ 8 टक्के पाणी वापरले जाते ही पाण्याची अक्षम्य हेळसांड असल्याकडेही मोदींनी आपल्या संबंधित भाषणात लक्ष वेधले. या जनआंदोलनात आपला सहभाग देऊन पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्यासाठी सर्व भारतीयांना आवाहन करताना मोदीजींनी तीन विनंत्या केल्या आहेत. एक म्हणजे, स्वच्छता अभियानाप्रमाणे जलसंवर्धनाचीही चळवळ उभी राहावी अशी विनंती पंतप्रधानांनी केली आहे. जलसंवर्धनाच्या पारंपरिक पद्धती, तसेच याकामी गुंतलेल्या व्यक्ती, तसेच संस्थांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘जनशक्ती फॉर जलशक्ती’ हा हॅशटॅग वापरून सार्‍यांनी आपल्याजवळील माहिती व उपाययोजना जाहीर कराव्यात, असे मोदीजींनी म्हटले आहे. या व्यापक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशभरातील 255 पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये ‘पाणी वाचवा’ मोहीम सुरू करण्यात येते आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply