Breaking News

बेफाम पर्यटकांना प्रशासनाकडून नियमांचा लगाम

कर्जतचा निसर्ग पावसाळ्यात विशेष खुणावत असतो, त्यावेळी फेसळत कोसळत असलेले धबधबे, धरणे, पाझर तलाव, गडकोट यांची सफर आणि ट्रेकिंग यांना विशेष पसंती दिली जाते, पण सातत्याने होणारे अपघात यामुळे निसर्ग पर्यटनाची ठिकाणेही बंदीच्या कक्षेत आली आहेत. मागील तीन वर्षे सातत्याने जिल्हा प्रशासनाने पावसाळी पर्यटनांवर काही प्रमाणात बंधने आणली आहेत. यावर्षी देखील निसर्ग आपल्या कवेत घेण्याचे पर्यटकांचे स्वप्न भंगले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने आपल्या आपत्कालीन बैठकीत त्यावर गांभीर्याने चर्चा केली आहे.

पावसाळ्यात असा कोणताही परिसर नाही की ज्या ठिकाणी पावसाळी पर्यटन फुलत नाही.कारण डोंगर दर्‍या आणि पाझर तलाव, धरणे यांचा परिसर पर्यटकांना आकर्षित करीत असतो, त्यामुळे 2000च्या दशकात खर्‍या अर्थाने पावसाळी पर्यटनाला सुरुवात झालेल्या कर्जत तालुक्यातील पावसाळ्यात पहिल्या दोन महिन्यात किमान 5 लाख पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्यात मागील काही वर्षात सोलनपाडा धरण, पाली भूतीवली धरणावर पर्यटनासाठी जाण्याचे प्रमाण वाढले होते, तर भिवपुरी रोड येथील आषाणे धबधबा हा एकटा किमान तीन लाख पर्यटकाना सामावून घेत असतो. त्याच वेळी पळसदरी तलाव, कोंढाणा, वदप, बेडीसगाव, जुम्मापट्टी, टपालवाडी, पाषाणे, आनंदवाडी येथील धबधबे आणि माथेरान हे थंड हवेचे ठिकाण या ठिकाणी पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी हजारोंच्या संख्येने येत असतात. हे पावसाळी पर्यटन सुरुवातीला येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी होते, मात्र नंतरच्या काळात त्या त्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी येत असताना मद्यपान केले जाऊ लागले आणि पावसाळी पर्यटनाला गालबोट लागू लागले. मद्यधुंद पर्यटक हे स्थानिकांचे न ऐकता थेट पाण्याच्या धोकादायक स्थिती असलेल्या ठिकाणी पोहोचू लागले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू होण्याच्या घटना होऊ लागल्या. या घटना एवढ्या वाढल्या की केवळ पावसाळ्यात 2018 मध्ये एकट्या कर्जत तालुक्यात तब्बल 17 जणांचे बळी गेले आहेत.त्यात पेब किल्ला, बेडीसगाव धबधबा, आनंदवाडी धबधबा, आषाणे धबधबा, जुम्मापट्टी धबधबा याशिवाय पाली भूतीवली धरण, सोलनपाडा पाझर तलाव आणि पळसदरी तलाव येथे पर्यटकांचे बुडून मृत्यू झाले आहेत. त्या त्या वेळी खोपोली येथून आपद्ग्रस्त टीमला पाचारण करून प्रसंगी दिवसभर आणि कधी कधी दुसर्‍या दिवशी देखील रेस्क्यू टीमला तेथे पुन्हा यावे लागत होते. तर माथेरानमध्ये असलेल्या रेस्क्यू टीमला देखील पेब किल्ला गाठून मदत करावी लागत असते. यात प्रशासन आणि स्थानिक यांना पावसाळ्यात सातत्याने जागरूक राहावे लागते.

पावसाला सुरुवात झाली की परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेले रूप प्राप्त होते. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. आता मोबाईल कॅमेर्‍यातही उत्तम दर्जाचे छायाचित्रण करणे शक्य असल्याने एखाद्या ठिकाणची छायाचित्र काही क्षणांत सोशल नेटवर्किंगवर सेल्फीच्या स्वरूपात अपलोड होतात व तितक्याच लाईक्सच अन् पोस्ट शेअर केल्या जातात व पर्यटकांची एकदा तरी जाऊ या म्हणत प्लँन्स ठरविले जातात. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगर कपारीतील फेसाळत वाहणार्‍या धबधब्यांमुळे विकेंडला येणार्‍यांची भलतीच गर्दी होत असते, मात्र त्या गर्दीला आवरण्यासाठी आणि त्या गर्दीत मद्यधुंद होऊन जाऊन वातावरण बिघडविणारे कृत्य केले जाते. त्यातून प्रशासनाला जमावबंदीचा आदेश लागू करण्याची वेळ सातत्याने येत आहे.त्यातून या भागाचा पर्यटनव्यवसाय हादेखील काही वर्षे उंचावत गेला होता, मात्र मागील तीन वर्षात सातत्याने वाढते अपघात आणि येणारी जमावबंदी यामुळे व्यवसायावर देखील परिणाम होऊ घातले आहेत. त्यामुळे जमावबंदीबाबत संमिश्र प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करीत असून सोलनपाडा ग्रामस्थ तर थेट आमच्याकडे पर्यटक नको, असे जाहीरपणे सांगत आहेत, तर आषाणे धबधबा येथे पर्यटकाना आडवू नका यासाठी स्थानिक प्रशासनाशी भांडत आहेत.

मात्र सतत घडणारे अपघात लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून लागू करण्यात आलेली जमावबंदी कर्जत तालुक्यातील धरणे, पाझर तलाव, धबधबे आदी ठिकाणी पाचपेक्षा अधिक जमावाने येण्यास जिल्हा प्रशासनाने बंदीबाबत जाहीर केली आहे.

2016, 2017 आणि 2018 मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी सहलीसाठी आलेल्या पर्यटकांचे पाण्यात बुडून जाऊन, वाहून जाऊन मृत्यू झाले होते. त्यामुळे 2018 मध्ये तब्बल तीन महिने धरणे आणि धबधबे यांच्या परिसरात जाण्यास 144 कलमाखाली जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता. गतवर्षीप्रमाणे यावर्षी 6 जुलैपासून 5 सप्टेंबरपर्यंत कर्जत तालुक्यातील धबधबे आणि धरणे या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तरी देखील मोठ्या प्रमाणात वर्षासहलीसाठी पर्यटक गतवर्षी आले होते आणि 144 कलम फोल ठरला होता. त्यामुळे या वर्षी अधिक ताकदीने जमावबंदी आदेश लागू झाला आहे.

हा निर्णय जिल्हा प्रशासनाने पोलीस दलावर मोठी जबाबदारी या निमित्ताने टाकली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे चोहोबाजूंनी टीका होत असून सरसकट बंदी नसून अटी आणि शर्थी घालून बंदी घालण्यात आल्याची माहिती प्रशासन देत आहेत.

-संतोष पेरणे

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply