रस्त्यावर अनेकवेळा खूप गर्दी जमलेली असते. त्याठिकाणी काय झाले आहे हे पाहाण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. गर्दीमुळे किवा उंचीमुळे आपल्याला ते पाहता येत नाही. त्यामुळे पुढे असलेला जे सांगेल तेच खरे असे आपल्याला समजावे लागते. गर्दीत ज्याला जसे दिसले त्याप्रमाणे तो सांगतो. त्यामुळे काहीवेळा आंधळ्यांनी पाहिलेल्या हत्तीच्या वर्णना सारखी अवस्था होते. समाजात वावरतांना अनेकांना याचा अनुभव येतो. त्यामुळे प्रसंगी टीकेचे लक्ष ही बनावे लागते.
दोन दिवसापूर्वी लंडनची बातमी वाचली. बुटक्या लोकांना गर्दीतही सहजपणे कार्यक्रम पाहता यावा, म्हणून इंग्लंडमधील संशोधक डॉमनिक विलकॉक्स यांनी पॅरिस्कोप ग्लासेस तयार केले आहेत. त्यांना ‘वन फूट टॉलर’ असे नाव दिले आहे. अशा प्रकारचे चष्मे वापरून गर्दीत उभी असलेली व्यक्ती समोर उभ्या असलेल्या लोकांच्या पलिकडे काय घडते आहे, हे पाहू शकेल. डॉमनिक यांनी सांगितले, मी एक कार्यक्रम पाहात होतो. तेव्हा एक बुटकी महिला बँड न पाहताच नृत्य करत होती. तिला संगिताचा कार्यक्रम पाहता येत नव्हता. त्या महिलेची अवस्था पाहूनच मला अशा प्रकारचा चष्मा तयार करण्याची कल्पना आली. डॉमिनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिस्कोप ग्लासेस चांगल्याप्रकारे काम करतात. त्यांच्या साह्याने पाठीमागे उभे राहूनही संपूर्ण कार्यक्रम पाहता येतो. हे चष्मे 45 अंशात डिझाइन केले आहेत. यात आरशासारखी अॅक्रलिक शीट वापरली आहे. या लहान चष्म्याला लावलेल्या वरच्या चष्म्याद्वारे तुम्ही पाठीमागे उभे असला तरी सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पाहून शकता, असे त्यांनी सांगितले. या अनोख्या चष्म्याबाबत लोकांची उत्सुकता वाढली आहेच. ही बातमी वाचताना माझ्या मनात पहिला विचार आला तो आपल्याकडे अनेकवेळा प्रशासकीय अधिकारी आणि राजकारण्यांची वक्तव्य पाहिली की त्यांना दिव्य दृष्टीची गरज असून त्यासाठी ही एखादा चष्मा बनवला तर… हो पण त्याचा रंग कोणता असावा, यावरून ही वाद
होईलच म्हणा. मंगळवारी पावसाला सुरुवात झाली आणि सगळीकडे तुंबापुरी झाली. त्याला जवाबदार मानवप्राणीच असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा अपयश लपवण्यासाठी ओरडून सांगितले. आपल्याकडे अनेक प्रशासकीय अधिकार्यांना अभ्यासामुळे चष्मा लागला असा समज आहे. पण तो खरा नसावा, असे मला नेहमी वाटतो. तो प्रशिक्षणाच्या वेळी त्यांना खास दिला जाणारा दिव्य दृष्टीचा चष्मा असावा. (पोलीस अधिकारी सोडून नाहीतर अनेक गुन्ह्याचा तपास लगेच लागला असता) कोणतीही घटना घडली की त्याबाबत चौकशी होण्यापूर्वीच कोण दोषी आहे, याची माहिती यांना मिळते आणि त्या दृष्टीने तपास होऊन अहवाल तयार होतो. विशेष म्हणजे यांच्या चष्म्यातून झुरळ, उंदीर, घुशी आणि खेकडे ही सुटत नाहीत. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक आवडता पदार्थ म्हणजे चिंबोरी, म्हणजेच खेकडा. तुमच्या डोळ्यांसमोर खेकड्याचे एक ना अनेक पदार्थ आले असतील. खेकड्याचं झणझणीत कालवण, भरले खेकडे, खेकडा लॉलीपॉप आणि बरंच काही… आहाहा पण त्यांनाही सोडले जात नाही. पनवेल स्टेशन जवळच्या मालधक्का झोपडपट्टीत पाहिल्याच पावसात तीन दिवस पाणी होते. त्याठिकाणी जखमा असलेले कुष्ठरोगी आहेत त्यांच्या झोपडीत ही पाणी गेले होते. तेथील सामाजिक कार्यकर्ते अशोक आंबेकर आणि विशाखा इंगोले यांच्याकडे अशा प्रकारचा चष्मा असता तर रेल्वेच्या ठेकेदाराची किवा महापालिकेची चूक नसून तेथील झाडाझुडपांची आणि तेथील भिंत न पोखरणार्या खेकड्यांची चूक आहे, हे त्यांच्या लगेच लक्षात आले असते. त्यामुळे वृषालीताईना ही पावसात धावाधाव करायला लागली नसती. जुलै महिन्याच्या महासभेत आयुक्तांनी प्रशासकीय अधिकार्यांबरोबरच दिव्य दृष्टीचा चष्मा सर्व नगरसेवकांना देण्याची मागणी वृषाली ताई करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला पाठिंबा देताना तो भगव्या रंगाचा नसावा आणि त्याच्यावर कोठेही कमळ नसावे, अशी मागणी प्रितमदादा करणारअसल्याचे समजते.
-नितीन देशमुख, फेरफटका