पनवेल : प्रतिनिधी – खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र धबधब्यावर प्रवेशबंदी असताना, चोरवाटामार्गे धबधब्यावर जाऊन एका नाल्यात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांची सुटका खारघर पोलिसांनी केली.
खारघरला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ठाणे, कल्याण, मुंबई, उपनगर, रायगड, पनवेल आदी ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे काहींना आपला जीव गमवावा लागल्यानंतर वन विभाग आणि खारघर पोलिसांनी पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे, मात्र शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास 30 ते 40 तरुण अंघोळ करीत असताना डोंगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला. मध्यभागी नाला दुथडी भरून वाहू लागल्याने काही तरुणांनी वाचवा अशी हाक दिली. पांडवकडा धबधब्याच्या प्रवेश मार्गावर सकाळी 10च्या सुमारास कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी डी. बी. सुतार, नीलेश तावडी, राकेश अहिरे आणि शंकर कदम आदी पोलिसांनी अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका केली.