Breaking News

गुरू ः एक भावनासुद्धा!

मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुबक, घाटदार व चित्ताकर्षक मृत्तिकापात्र बनविण्यासाठी चांगल्या कुंभाराची गरज असते, त्याचप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मार्गदर्शकाची अथवा गुरूची  आवश्यकता असते.  मुलाची वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी तसेच त्याच्या विचारांना प्रगतिकारक दिशा देण्यासाठी गुरूची फार महत्त्वाची भूमिका असते. सुसंस्कृत विचार करण्याची शक्ती गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच मुलांच्यात निर्माण होत असते.  चांगल्या व वाईट विचारांची पारख करण्याची प्रेरणा गुरू आपल्या स्वतःच्या वागणुकीने देत असतात.  गुरू-शिष्याचे नाते हे आरसपानी असते. शिष्य आपल्या सुसंस्कृत व परिपक्व आचार विचारांतून आपल्या गुरूचे मोठेपण सिद्ध करीत असतात.   आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे स्थान हे खूप वरच्या दर्जाचे आहे. ते विविध रूपात येऊन आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व विद्वान मंडळी आपल्याला यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन करताना गुरूची भूमिका पार पाडत असतात. आपल्यापैकी कोणीही जन्माला येताना बरोबर ज्ञानाची शिदोरी घेऊन येत नाही.  जन्माला आल्यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून आपण ज्ञान प्राप्त करून घेत असतो.  प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार तसेच इच्छेनुसार ज्ञान आत्मसात करीत असतो.  जीवनातील विविध टप्प्यांवर आपल्याला विविध रूपात गुरू मिळून आपले जीवन ज्ञानाने, आचार विचाराने, संस्काराने समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात.

आपले पहिले गुरू असतात ते आपले माता व पिता.  आपल्याला जगाची प्रथम ओळख आपले माता-पिताच आपल्याला करून देतात.  आपल्या संस्कारक्षम वयात आईवडील या दोन गुरूंच्या सान्निध्यात आपण आपला काळ व्यतीत केलेला असतो. त्या दोघांनी केलेले संस्कार आपल्याला जन्मभर साथ देत असतात. आपल्यावर झालेले संस्कार व आपली विचारसरणी याचे सर्व श्रेय आपल्या प्रथम गुरूजनांना म्हणजेच आपल्या

माता-पित्यांना जाते. आपण आज शिकून कितीही विद्वत्ताप्रचूर बोलत असलो तरी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपला पहिला शब्द आपल्या आईनेच आपल्या तोंडून वदवून घेतलेला असतो. शब्दांच्या अर्थासह आपला शब्दसंग्रह वाढवण्यात आपल्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. शब्द व वाक्ये शिकविताना आपल्या संस्काराचे धडेही त्यांनी तेव्हढ्याच तळमळीने दिलेले असतात. थोरामोठ्यांशी कसे वागायचे, कसे बोलायचे याचे धडे आपल्याला आईवडिलांकडूनच मिळतात.  आपापल्या आईवडिलांची ही अमूल्य देणगी आपल्या आयुष्याला वळण व दिशा देते. त्याचबरोबर यशाची शिखरे गाठण्यासाठी बळही देते. गुरूंच्या रूपातील आईवडिलांनी मायेने, ममतेने व जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली ही शिदोरी आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते. आपल्या कृतीला अथवा आचार विचारांना कोणत्या ना कोणत्या रूपातील गुरूचा वरदहस्त असतो.  गुरू ही एखादी व्यक्तीच असते असे नाही तर ती कधी भावनाही असू शकते. गुरू ही एक भावना असू शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एकलव्याने गुरू द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून व त्या पुतळ्यासमोर उभे राहून तिरंदाजीची कला हस्तगत तर केलीच, पण त्यात प्राविण्यही मिळविले.  या पुतळ्याच्या रूपातील द्रोणाचार्य आपल्याला शिकवत आहेत, मार्गदर्शन करीत आहेत अशी भावना मनात ठसवून एकलव्याने तिरंदाजीत यश मिळविले. गुरू ही भावना मनात धरून एकलव्याने शरसंधान या कलेत यश प्राप्त केले. ते पाहून सव्यसाची (दोन्ही हातांनी तिरंदाजी करू शकणारा अर्जुन)सुद्धा अचंबित झाला.  एवढी शक्ती जर गुरू या नुसत्या भावनेत असेल तर प्रत्यक्ष गुरूचा वरदहस्त किती प्रभावशाली असेल याचा विचार प्रत्येक शिष्याने करणे गरजेचे आहे असे वाटते. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात आपण आपल्या घरच्या गुरूच्या म्हणजेच आईवडील व इतर नातेवाईक यांच्या मायेच्या छत्राखाली असतो. कधी कधी आपण शालेय तसेच महाविद्यालयीन गुरूंची थट्टा मस्करीही करतो. कारण आपण म्हणावे तेवढे परिपक्व झालेले नसतो. शिवाय आपल्याला आपल्या घरच्या गुरूंचे कोंदणही असते. या कोंदणातून बाहेर पडल्यावर जगात वावरताना आपल्याला शालेय तसेच महाविद्यालयीन गुरू प्रकर्षाने आठवतात व नकळतपणे मनातील एक कोपरा हळवा होतो. हीच खरी गुरूची ओळख आहे. मनातील ही भावनाच गुरूंनी केलेल्या संस्कारांची पावती आहे. गुरूंनी आपल्या मनावर बिंबविलेले विचार तसेच आपल्या मनाला भावलेले त्यांचे विचार आपल्याला जगाच्या रहाटगाडग्यात शिरल्यावर प्रकर्षाने जाणवतात  व त्याची परिणीती ते विचार पटण्यात होते. कधी कधी मोक्याच्या क्षणी ते विचार आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे जाणवतात व आपल्याला मदत करतात. त्याचवेळेस कुठेतरी मनात वाटते की त्याक्षणी तसे विचार मनावर बिंबविणारे गुरू आपल्या समवेत असावेत. काळाच्या ओघात गुरू-शिष्याची जरी ताटातूट झाली असली तरी गुरूंनी दिलेल्या विचारांच्या देणगीमुळे गुरू-शिष्य या दोघांच्यात कधीच अंतर पडत नाही. आपण कितीही मोठे झालो तरी आपले गुरू आपल्यापेक्षा मोठे आहेत ही भावना कधीच विसरता येत नाही. ही भावना म्हणजेच गुरूबद्दलचा आदर आहे. याचमुळे आपण आपल्या मुलांच्या गुरूलाही तेवढाच आदर देतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या गुरूंनी आपल्यावर केलेले संस्कार.

मला वाटते गुरू ही नुसती आदरणीय व्यक्ती नसून ती एक चालती बोलती सुसंस्कारांची खाण असलेली संस्था आहे.  आपल्या मनाची, आचार विचारांची जडणघडण ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेली असते. आपण आपल्या मनाशी संवाद साधताना गुरूंनी दिलेल्या विचारांची मदत घेऊन मनातील विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न करतो.  मनातील सुसंगत तसेच सन्मार्गी विचारांवर गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा, विचारांचा तसेच केलेल्या सुसंस्कारांचा प्रभाव असतो. अवचितपणे आपल्याला जर शालेय तसेच महाविद्यालयीन गुरू भेटले तर तो आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही व त्याचबरोबर नकळतपणे नतमस्तक होऊन आपोआप नमस्कार करण्यासाठी हात जोडले जातात.  हात जोडले जाणे ही भावना आहे.  ज्यांच्यामुळे आपल्या मनावर संस्कार झाले ते मन त्यांच्यापुढे आदराने नतमस्तक होते. प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगवेगळी असते. काही जणांची तीव्र असते तर काही जणांची थोड्याफार प्रमाणात कमकुवत असते, पण मुळातच ग्रहण काय करायचे याचे मार्गदर्शन करणारा कोणी नसेल तर त्या ग्रहणशक्तीचा उपयोग नसतो. अशा वेळेस मार्गदर्शन करणारी जी व्यक्ती असेल ती व्यक्ती गुरू म्हणून आपल्या मनात ठसते. विद्यार्थ्यांना तळमळीने शिकविणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे तसेच मित्रत्वाच्या नात्याने सुसंवाद साधणारे पण कधी कधी कठोर वागणारे गुरू विद्यार्थीवर्गात जास्त लोकप्रिय असतात.  त्यांचे शिकविणे म्हणजे त्या विषयाचा रसास्वाद घेण्यासारखे असते. गुरूंचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे ज्ञान घेता घेता शिष्याने ज्ञानार्जनाच्या बाबतीत आपल्याही पुढे जावे व याकरिता ते सर्वतोपरी मदत करतात.  गुरूच्या ठायी असलेला आणखी एक गुण म्हणजे गुणग्राहकता.  शिष्याचे गुण ओळखून त्याने अधिक यशस्वी व्हावे म्हणून त्याला विद्यादान करताना थोडी अधिक मेहनत घेणे.  असे गुरू मिळणे म्हणजे शिष्याचे भाग्य.

 -मिलिंद कल्याणकर

नेरुळ, नवी मुंबई.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply