Breaking News

‘दिबां’च्या नावाचा अंगार गावागावात पेटणार!

मशाल मोर्चासाठी भूमिपुत्र सज्ज

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी अर्थात सोमवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता ‘दिबां’च्या जासई (ता. उरण) या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 8) जासई येथे जाऊन तयारीची पाहणी केली.
नवी मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून तिसर्‍यांदा हा एल्गार पुकारण्यात आला आहे.
या वेळी प्रत्येक मशाल ही लोकनेते दि. बा. पाटील यांनी दिलेल्या क्रांतीच्या लढ्याची ओळख असेल. त्यामुळे प्रत्येक गाव आपल्या भूमिपुत्रांच्या व्यथा या मशाल मोर्चाद्वारे मांडेल आणि शपथ घेऊन पुढच्या तीव्र आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे. नावाबाबत केंद्राला घाई नाही, मात्र ठराविक नाव देण्याची घाई महाराष्ट्र सरकारला झाली. त्यामुळेच संघर्षाची लढाई सुरू झाली असून ती जिंकण्यासाठी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त मैदानात उतरला आहे. 15 ऑगस्टची राज्य सरकारला डेडलाइन देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निर्णय द्यावा; अन्यथा 16 ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडले जाईल, असा इशाराही देण्यात आलेला आहे.
मशाल मोर्चा हा 10 व 24 जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे. या मशाल मोर्चासाठी ज्या मशाली प्रज्वलित केल्या जातील त्याची सुरुवात लोकनेते दि. बा. पाटील यांचे जन्मगाव जासई येथून महापुरुष, हुतात्म्यांना तसेच ‘दिबां’ना वंदन करून करण्यात येईल. त्यासाठी 9 ऑगस्ट रोजी तेथे एक मोठी क्रांतिज्योत प्रज्वलित केली जाईल.
या वेळी कृती समितीचे सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध जिल्ह्यांतून, तालुक्यातून व विभागातून आलेले विशेष प्रतिनिधी मुख्य मोठ्या ज्योतीद्वारे आपल्या मशाली प्रज्वलित करतील व आपापल्या ठिकाणी घेऊन जातील. त्यानंतर विशेष प्रतिनिधींनी नेलेल्या मशालीची ही क्रांतिज्योत त्या त्या ठिकाणच्या गावागावातून आलेले प्रतिनिधी, मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावासाठी ही क्रांतिज्योत प्रज्वलित करतील आणि गावात वा विभागात मशाल मोर्चा काढतील. या वेळी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणाची प्रतिज्ञा केली जाणार आहे. यासाठी भूमिपुत्र सज्ज झाले आहेत.
दरम्यान, मशाल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जासई येथेे करण्यात आलेल्या तयारी पाहणीच्या वेळी सर्वपक्षीय कृती समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल, सहचिटणीस सुरेश पाटील, विनोद म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, विवेक म्हात्रे, आदित्य घरत, संजय ठाकूर, मुख्याध्यापक अरुण घाग, नुरा शेख आदी उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply