Breaking News

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी (दि. 23) दिली. ते कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देशातील 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना 1 एप्रिलपासून कोरोनावरील लस दिली जाईल. या लसीकरणासाठी 45 वर्षांवरील नागरिकांनी आपल्या नावांची नोंदणी करावी, असे आवाहन जावडेकर यांनी या वेळी केले, तसेच भारताकडे कोरोनावरील लशीचे पुरेसे डोस आहेत आणि सरकारने मंजुरी दिलेल्या दोन्ही लशी प्रभावी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंत चार कोटी 85 लाख नागरिकांचे कोरोनावरील लसीकरण झाले आहे. चार कोटींहून अधिक नागरिकांना एक डोस, तर 85 लाखांपेक्षा जास्त लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. गेल्या 24 तासांत 32 लाख 54 हजार डोस देण्यात आले आहेत. देशात लसीकरणाची मोहीम योग्य पद्धतीने आणि वेगाने सुरू आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हणाले
‘कोविशिल्ड’च्या दोन डोसमधील अंतर वाढले
भारतात कोरोनावर देण्यात येणार्‍या कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमध्ये आता सहा ते आठ आठवड्यांचे अंतर असणार आहे. याआधी पहिल्या डोस घेतल्यानंतर दुसरा डोस चार ते सहा आठवड्यांच्या आत घेतला जायचा, परंतु आता या डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे. नॅशनल टेक्निकल अ‍ॅडवायजरी ग्रुप ऑन ईम्युनायजेशन आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply