सरकारी यंत्रणांवर ढिसाळ कारभाराचा आरोप करणार्या टीकाकारांनी ही वस्तुस्थिती आधी लक्षात घेतली पाहिजे. खरेतर अशा परिस्थितीत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी केली जाताच कामा नये. कारण ही वेळ राजकारणाची नसून सर्वांनी परस्पर सहकार्याने या अस्मानी संकटाला परतवून लावण्याची गरज आहे. या महापुराची तीव्रता भयावह आहेच परंतुु तरीही आपल्या एकजुटीपुढे या नैसर्गिक विपदेलाही पाय मागे घ्यावाच लागेल. महाराष्ट्राचा संपन्न, सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जाणारा पश्चिम महाराष्ट्र गेले तीन दिवस महापुराशी प्राणपणाने झुंजतो आहे. कोल्हापूर, सांगली, कराड या परिसरात महापुराने सध्या घातलेले थैमान हे कुठल्याही राष्ट्रीय आपत्तीपेक्षा कमी भयावह दिसत नाही. सधन गणल्या जाणार्या या साखर पट्ट्याला नैसर्गिक उत्पाताला तोंड द्यावे लागते आहे. त्याचे पडसाद दूर मुंबई-पुण्यापर्यंतही उमटत आहेत. येथून होणारी भाज्यांची आणि दुधाची आवक थांबल्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरात भाज्यांचे भाव कमालीचे भडकले असून दुधाची टंचाई जाणवू लागली आहे. अर्थातच या समस्या महापुराचा सामना करणार्या त्या परिसरातील परिस्थितीसमोर किरकोळ वाटाव्यात अशाच आहेत. सांगली जिल्हा तर चोहोबाजूंनी पाण्याने वेढला गेला आहे. या जिल्ह्यातील पलुस तालुक्यात ब्रह्मनाळ येथे गुरूवारी बोट उलटून 9 पूरग्रस्तांचा हकनाक बळी गेला. ही एक खाजगी बोट होती व बोटीत क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक जणांना बसवण्यात आले होते. अर्थातच जीव वाचविण्याच्या आकांतातून असे प्रकार घडतात. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा रद्द करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट कोल्हापूरकडे धाव घेतली आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील त्यांचे अन्य काही सहकारी देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तेथे दिवसरात्र तळ ठोकून आहेत. हवाई पाहणीतून तेथील विदारक प्रलंयकारी परिस्थिती उघड झाली आहे. कोल्हापूरमध्ये जीवित हानी फारशी झाली नसली तरी या शहराला देखील पुराच्या पाण्याने वेढले आहे. सांगलीतील परिस्थिती मात्र खूपच गंभीर आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटर्समुळे पुराचे पाणी ओसरत नसल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी संपर्क साधून, आलमट्टी धरणातून वेगाने विसर्ग करण्याची विनंती केली होती. कर्नाटक सरकारने या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यामुळे सांगलीतील पूर ओसरण्यास मदत हाईल अशी अपेक्षा आहे. या प्रलयामुळे लाखो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. लाखोंना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांचे संसार मात्र महापुराच्या पाण्यात तरंगतानाची भयानक दृश्ये दिसत आहेत. उसाच्या पिकाचेही अपिरिमित नुकसान झाले आहे. तथापि जीवितहानी टाळणे हा अग्रक्रम ठरवून महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांना जीवानिशी वाचवण्याला प्राधान्य दिले आहे. पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्यसेवा पुरवण्याचीही विशेष दक्षता घेतली जात असून साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तब्बल 25 हून अधिक पथके, नौदलाच्या होड्या, हवाई दलाची हेलिकॉप्टर्स, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते अशी खूप मोठी बचावयंत्रणा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र राबते आहे. परंतु असे असले तरी या नैसर्गिक विपदेचे स्वरुपच इतके भयावह आहे की सारे मानवी प्रयत्न तोकडे पडत आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …