उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिरनेरजवळील मोठेभोम गावातील प्रवेशद्वारालगत असलेल्या तळ्यात कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. सदर तळे हे चिरनेर-पनवेल महामार्गावर असल्याने या कचर्यामुळे रस्त्यावरील प्रवासी व अन्य वाहनधारकांनाही त्यांच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता, तर या तळ्यात पाण्यापेक्षा कचराच अधिक प्रमाणात असल्याचे दिसत होते. तळ्याची अक्षरशः दुरवस्था झाली होती. त्यामुळे मोठेभोम गावातील संभा एक छावा ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन या मोठेभोम येथील तळ्याच्या साफसफाईचे काम हाती घेऊन पूर्णत्वास नेले आहे. या मध्ये मोठीजुई ग्रुपग्रामपंचायतीचे सदस्य तुषार पाटील, अजित पाटील, अतिष पाटील, संग्राम ठाकूर, मोहन पाटील व सुमित पाटील या तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे यापुढे या तळ्यात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संभा एक छावा ग्रुपने येथील नागरिकांना दिला आहे, तर संभा एक छावा ग्रुपने ही तळ्यातील सर्वांच्याच नजरेत येणार्या कचर्याची विल्हेवाट लावून स्वच्छता मोहीम यशवस्वी केली. याबाबत येथील ग्रामस्थांकडून या तरुणांच्या कार्याचे कौतुक केले आहे.