रायगड जिल्ह्यात सध्या पावासाने धुमाकूळ घातला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक पर्जन्यमानाच्या 105 टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे रायगडातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे महाड, नागोठणे, रोहा येथे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या शहरांमध्ये पुराचे पाणी घुसते. पूर आला की बातम्या प्रसिध्द होतात. शासकीय यंत्रणा कामाला लागते. दोन-तीन दिवस चर्चा होते. नंतर सर्व विसरतात. त्यावर उपाययोजना मात्र केली
जात नाही.
महाड शहर सावित्री नदीच्या किनारी वसले आहे. रोहा कुंडलिकेच्या, तर नागोठणे अंबा नदीच्या किनारी आहे. ही तीनही शहरे पूर्वी बंदरे होती. त्यामुळे ही शहरे नदीच्या किनार्यावर वसली. पुढे ही शहरे विस्तारली. पूर्वी या नद्या खोल होत्या. नंतर नद्यांंची पात्रे गाळाने भरली. त्यामुळे ही बंदरे काळाच्या ओघात बंद झाली, परंतु बाजारपेठा तिथेच राहिल्या. नद्यांची पात्रे गाळाने भरल्यामुळे उथळ झाली. थोडा जास्त पाऊस झाला की नद्या दुथडी भरून वाहू लागतात. पाऊस पडला आणि त्याचवेळी समुद्राला भरती आली की महाड, नागोठणे व रोहा या शहरांमध्ये पुराचे पाणी घुसते.
शहारांमध्ये पुराचे पाणी घुसण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे नद्यांची पात्रे उथळ झाली आहेत. सावित्री, अंबा व कुंडलिका या नद्यांमध्ये येणारे पाणी सह्याद्री पर्वतरांगावरून येते. त्यामुळे या शहारांमध्ये जरी पाऊस कमी पडला तरी नद्यांच्या उमगस्थानाजवळ पाऊस पडला तरी ते पाणी या नद्यांमधून शहरांपर्यंत येते. या पाण्यातून दगड, गोटे, माती वाहून येते. त्याचा गाळ तयार होतो. सावित्री, कुंडलिका, अंबा या तीनही नद्यांची पात्रे गाळाने भरली आहेत. हा गाळ कित्येक वर्षे काढलाच गेला नाही. त्यामुळे दरवर्षी पुराची समस्या निर्माण होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधील नद्यांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी ड्रेझर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही.
महाड शहर सावित्री आणि गांधारी यांच्या संगमावर वसले आहे. महाड एक मोठे व्यापारी बंदर होते. ज्या सावित्री नदीच्या काठी महाड शहर वसले आहे त्या सावित्री नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये होतो. पोलादपूर तालुक्यातून ती महाड शहरात येते आणि पुढे बाणकोट येथे समुद्राला जाऊन मिळते. महाबळेश्वर येथून दर्याखोर्यातून वाहत येताना या पाण्यातून माती वाहून येते. त्यामुळे सावित्री नदीचे पात्र गाळाने भरले आहे. दासगाव येथे या नदीवर कोकण रेल्वेने पूल बांधला आहे. त्यासाठी नदीत भराव करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्र उथळ झाले आहे. तसेच महाड शहराजवळ सावित्री नदीमध्ये दोन बेटे आहेत. त्यामुळेही पाणी अडते. प्रभाकर मोरे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी महाड शहरात येणार्या पुराची समस्या सोडविण्यासाठी एक योजना आखली होती. सावित्री नदीमधील बेटे तोडायची. शहारात जेथून नदीचे पाणी घुसते तेथे संरक्षक भिंती उभारायच्या, तसेच सावित्री व गांधारी नदीच्या पाण्याचा वेग कमी व्हावा यासाठी या दोन्ही नद्यांवर धरणे बांधायची. ही योजना चांगली होती, परंतु ती अमलात आलीच नाही.
कुंडलिका नदीचे पात्रही गाळाने भरले आहे. रोहा शहराजवळ या नदीमध्ये बेटे आहेत. ज्याप्रमाणे सावित्री नदीतील बेटे धोकादायक आहेत त्याचप्रमाणे कुंडलिका नदीतील बेटेही धोकादायक आहेत. ही बेटे काढून टाकावीत तसेच रोहा शहरातलगत नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्यात यावी असा प्रस्ताव होता. त्यापैकी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. अंबा नदीचे पात्र पूर्ण गाळाने भरले आहे. त्यामुळे नागोठणेमध्ये पाणी शिरते.
वाढत्या शहरीकरणामुळे होणारे भराव, बांधकाम यामुळे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्ग बुजवण्यात आले आहेत किंवा अरूंद करण्यात आले. त्यामुळे शहरी भागात पाणी साचून राहते. पनवेल, उरण, अलिबाग, पेण या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेेत. या बांधकामांसाठी भराव टाकल्यामुळे आता या शहारांमध्येही पाणी साचून राहू लागले आहे. यावर्षी अलिबाग शहर प्रथमच जलमय झाले होते. यापूर्वी अलिबाग शहरात एवढे पाणी कधीच घुसले नव्हते. अलिबाग एसटी स्थानकात कमरेभर पाणी होते. याचे कारण अलिबाग शहारातून वाहणारे दोन मुख्य नाले तुंबले होते. अलिबागमध्ये 3 व 4 ऑगस्ट रोजी 331 मिमी पाऊस पडला. एवढ्या पावसातही जगदाळे
हॉस्पिटलजवळून वाहणारा नाला वाहत नव्हता. पीएनपीनगरच्या मागून वाहणार्या नाल्याचे पाणी मच्छीमार्केटच्या बाजूने वेगात वाहत होते. दोन्ही नाले पावसाळ्यापूर्वी साफ केले असते, तर अलिबागमध्ये शेतकरी भवन, रायगड बाजार, एसटी आगार परिसरात एवढे पाणी साचलेच नसते. खरंतर पूर का येतो याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, पण तसे होत नाही. नदीपात्रात साचलेला गाळ, बांधकामासाठी केलेले भराव, पाणी वाहून जाणार्या मार्गावर केलेले अतिक्रमण पूर येण्याची मुख्य कारणे आहेत. त्यामुळे नद्यांतील गाळ काढून नदीपात्र खोल करणे, पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्ग मोकळे करणे, सावित्री, गांधारी नद्यांवर धरण बांधून पाण्याचा वेग कमी करणे, नदीकिनारी संरक्षक भिंती बांधणे या उपाययोजना करायला हव्यात, अन्यथा नेमेचि येतो पावसाळा, या उक्तीप्रमाणे पूर येतच राहणार, नुकसान होतच राहणार.