माणगांव कोर्टाचा निकाल
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील फलाणी येथील प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये दोन अल्पवयिन विद्यार्थिनींवर अत्याचार व अनैसर्गिक अत्याचाराचे अमानुष कृत्य करणार्या नित्यानंद धोंडू पाटील या नराधमास माणगाव येथील अतिरीक्त सत्र जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (दि. 19) आजन्म (मरेपर्यंत) कारावासाची शिक्षा सूनावली आहे.
या गुन्ह्यातील फिर्यादी यांची पीडित मुलगी व तिची एक मैत्रीण फलाणी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत होत्या. त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्या इयत्ता दुसरीमध्ये शिकत असल्यापासून आरोपीत नित्यानंद धोंडू पाटील याने 2016 ते 17 जुलै 2019 या कालावधीत शाळेच्या जुन्या इमारतीच्या खोलीत जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार व अनैसर्गिक अत्याचार केला. सदर प्रकार कोणाला सांगितला तर मी तुम्हाला मारेन अशी पीडित मुलींना धमकी दिली.
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भादविकलम 376(2)(एफ) (आय)(एन), 376 (सी)(बी), 376(एबी), 377,506, व पोक्सो कायदा कलम 4,6,8 तसेच अ.जा.ज.का.क.1(1) (डब्ल्यू)(ळ)(ळळ), 3(2)(7) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास माणगावचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शशीकिरण काशिद यांनी केला. व दोषारोप पत्र माणगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या कोर्टात झाली.
या खटल्यात पीडित दोन मुलीं, एका पीडित मुलीची आई, फिर्यादी व शाळेवर असणार्या सहशिक्षिका तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी उदय धुमास्कर, महिला पोलीस हवालदार छाया कोपनर, हवालदार शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, पोलीस शिपाई सुनील गोळे यांनी सहकार्य केले.
साक्षीदारांची साक्ष व न्यायनिर्णयाच्या आधारे न्या. पी. पी. बनकर यांनी आरोपी नित्यानंद धोंडू पाटील याला दोषी ठरवून गुरुवारी भादवि कलम 376,377, व पोक्सो कायदा कलम 4,6,8 नुसार आजन्म (मरेपर्यंत) कारावास, सक्तमजुरीची व एक लाख 50हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.