Breaking News

ये क्या जगह है दोस्तो…

खय्यामसाहेब नसलेल्या जगात अभिजात भारतीय संगीताच्या भोक्त्यांची मनोवस्था ‘ये क्या जगह है दोस्तो, ये कौनसा दयार है’ अशीच झाली असावी. ‘उमराव जान’ या अद्भुतरम्य चित्रपटाला खय्यामसाहेबांनी आपल्या स्वरचांदण्याने अक्षरश: मढवून टाकले. त्यांची ही गाणी कालातीत आहेत. हा माणूस बहुप्रसवा नव्हता. या माणसाने साठ वर्षांच्या अख्ख्या कारकिर्दीत फक्त 54च चित्रपट केले. याचे प्रमुख कारण हे होते की त्यांचा अभिजात संगीताचा सूर त्यांना प्राणपणाने जपायचा होता. आपल्या संगीताला आता जागा नाही अशी जाणीव झाल्यावर ते शांतपणे कोपर्‍यात गेले.

एखाद्या सुरेल मैफलीची पहाटेस सांगता व्हावी आणि त्या मैफलीत रात्रभर तेवत राहिलेली एक शमा… एक ज्योत नंतर शांतपणे विझून जावी तशी काहीशी उदास भावना आज भारतीय चित्रपट संगीताच्या दुनियेत अरली आहे. ‘खय्यामसाहेबांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला’ अशी श्रद्धांजली खुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीच वाहिली आहे, यातच सारे काही आले. हिंदी चित्रपट संगीताच्या एका महान परंपरेचा अखेरचा दुवा सोमवारी रात्री निखळला. वास्तविक गेली दोन-अडीच दशके खय्यामसाहेब चित्रपट संगीतापासून दूरच होते. फ्युजन, रिमिक्स, वेस्टर्न ‘साऊंड’, इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा पराकोटीचा वापर अशा नव्या धाटणीच्या संगीताशी त्यांची नाळ जुळणे शक्यच नव्हते. खय्यामसाहेब हा अभिजात संगीताच्या चंदेरी दुनियेतला अंत:स्वर होता. पाश्चिमात्य ठेक्याची आणि वाद्यमेळाची गाणी त्यांनी कधीच दिली नाहीत. काळाबरोबर आपल्याही शैलीत बदल करावा असे त्यांना वाटले देखील नाही. एखाद्या निर्मात्याने कातरत का होईना तसा आग्रह धरलाच तर ते चक्क हात जोडून नम्रपणे सांगत ‘वो मुझे नहीं आता’. हा प्रतिभावान संगीत तपस्वी आयुष्यभर प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहिला. खय्यामसाहेब लुधियाणातून मुंबईत नशीब आजमावायला आले होते. अवघ्या 17 वर्षांच्या खय्याम साहेबांनी प्रचंड मेहनतीने या दुनियेत लौकिक कमावला. त्याकाळच्या आघाडीच्या संगीतकार मंडळींनी तेव्हा भारतीय चित्रपट संगीत दुमदुमत ठेवलेे होते. त्यांच्या मांदियाळीत खय्यामसाहेबांनी स्वत:चे नाव उभे केले. पुढे पुढे तर शंकर जयकिशन, ओ. पी. नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा महिन्याकाठी डझनभर गाणी देणार्‍या संगीतकारांमध्ये एक अभिजात मिणमिणता सूर होता तो खय्यामसाहेबांचा. साठच्या दशकात एका निर्मात्याने त्यांना ‘जरा नौशाद साहेबांसारख्या तर्ज बनवा’ अशी ऑर्डर दिली, तर खडतर परिस्थिती असताना देखील खय्यामसाहेब तिथून उठून गेले. त्यांचे म्हणणे इतकेच होते की खय्याम खय्यामसारख्या तर्ज बनवील. त्यांच्या गाण्यातली कशीश त्यांनी प्राणपणाने जपली, कारकीर्दभर. ‘वो सुबह कभी तो आएगी’ या गाण्याने त्यांना ओळख मिळवून दिली. स्ट्रगल संपला. त्यावर ‘आशा मेरी सुबह लायी’ असे अद्गार त्यांनी काढले. कभी कभी, उमराव जान या चित्रपटांसाठी अत्यंत बहारदार गाणी त्यांनी दिली. या अभिजात आणि अजरामर गाण्यांखातर त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले गेले. आजच्या उठवळ संगीताच्या कालखंडात खय्यामसाहेबांचे निव्वळ असणे हा केवढा तरी मोठा दिलासा रसिकांना होता.  ‘रंगुनि रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा’ या ओळी चपखलपणे त्यांनाच लागू होतात. या अलौकिक प्रतिभावंताला ‘दैनिक रामप्रहर’कडून श्रद्धांजली.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply