अभ्यासाचे टेंशन आल्याने नुकतीच एका दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. मुबईमध्ये एका पोलीस अधिकार्याच्या मुलाने काही वर्षांपूर्वी आई अभ्यास करायला सांगते म्हणून तिचा खून केला होता. शेगावच्या ऋतुजा गवईने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. मुले अशी का वागतात? याकडे पैशाच्या मागे लागलेल्या पालकांना लक्ष द्यायला वेळ नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल लागला की पुढे काय करायचं या विचारात पालक आणि विद्यार्थी संभ्रमात पडतात. विद्यार्थ्याचे गुण हे आजच्या परीक्षा पद्धतीचा विचार केला तर फसवे असतात. त्यामुळे गुणांचा विचार करून करिअर निवडल्यास मुलाला अभ्यास न झेपल्याने त्याला नैराश्य येऊ शकते आणि त्यातून पालकांनी त्याला दोष दिल्यास नैराश्य आलेल्या मुलांच्या हातून वरीलप्रमाणे घटना घडू शकते. यासाठी मुलाचे करिअर निवडताना फक्त त्याला मिळालेल्या गुणांचा विचार न करता मुलांची बुद्धिमता, स्वभाव, आवड-निवड आणि क्षमता याचाही विचार करणे गरजेचे आहे.
प्रत्येक मूल जन्माला येताना 8 वेगवेगळी बुद्धिमत्ता आणि 9 वेगवेगळे स्वभाव घेऊन जन्माला येते. प्रत्येकामध्ये त्याचे प्रमाण वेगवेगळे असल्याने त्याचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते. करिअर निवडताना मुलामध्ये कोणते चांगले गुण आहेत आणि त्याचा स्वभाव कसा आहे याचा याचा विचार करायला हवा. मी डॉक्टर आहे म्हणजे माझा मुलाने डॉक्टर झाले पाहिजे असे नाही. सुनील गावस्कर महान फलंदाज आहे, पण रोहन गावस्कर त्याच्यासारखा फलंदाज बनू शकला नाही. अमिताभ-जयाच्या अभिनयाची सर अभिषेकला नसल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत. त्यामुळे मुलांवर आपला निर्णय लादून त्याच्या करिअरची वाट लावू नये.
आपण 21व्या शतकात वावरताना शास्त्र प्रगत झाले आहे. मुलांमध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे हे ओळखण्यासाठी एम.आय. टेस्ट किंवा डी.एम.आय.टी यासारख्या आधुनिक परीक्षा देऊन माहिती करून घेता येते. प्रसंगी समुपदेशकाची मदत घेता येते. आपणही आपल्या मुलाचे निरक्षण करून, त्याच्याशी चर्चा करून, त्याचे चांगले गुण आणि स्वभाव ओळखून त्याला मार्गदर्शन करू शकतो. ‘तू हेच करिअर कर , हीच शाखा निवड’ असे बोलणे खरे तर पालकांनी टाळायला हवे. त्याला स्वतः निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसे केल्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि हाच आत्मविश्वास मुलांना यशस्वी करण्यासाठी मदत करेल. एकदा त्यांची आवड आणि क्षमता समजली की त्याची समाजाला गरज आहे का आणि हे केल्याने त्याला पैसा आणि मानसन्मान मिळेल का हे पाहणे. ते शक्य असल्याचे दिसून आल्यास त्याने निवडलेले करियर त्याच्यासाठी योग्य आहे.
डी.एम.आय.टी.सारख्या आधुनिक टेस्टमधून व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंची माहिती होते. मल्टिपल इंटेलिजंट, व्यक्तिमत्त्व, शिकण्याची पद्धत, विचारशक्ती वगैरे. प्रत्येक मनुष्याच्या अंगीभूत गुणवत्ता असते त्याचा शोध घेऊन स्वतःचे जीवन सुखकर करण्यासाठी त्याचा वापर करणे गरजेचे असते. अनेकांना आपल्यातील हे गुण ओळखण्याची संधी मिळत नाही. या टेस्टद्वारे ही संधी मिळून आपला सर्वांगीण विकास करण्याची दिशा मिळते. डरमेटोग्लायफिक्स म्हणजे बोटांच्या ठशांचा अभ्यास. प्रत्येक माणसाचे बोटांचे ठसे त्याच्या मज्जातंतूशी निगडित असतात यामुळे आपल्या अंगीभूत गुणांची व व्यक्तिमत्त्वाची माहिती मिळते. जीवनात अनेक प्रसंगांना आपण कसे स्वीकारू आणि कोणते वातावरण किती सुखकारक वाटेल हे आपल्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. 1926मध्ये डॉक्टर होरोल्ड कामिन्स यांनी ‘डरमेटोग्लायफिक्स’च शोध लावला. 1950 मध्ये प्रा. पेनफील्ड यांच्या ‘क्रॉस सेक्शन डायग्राम ऑफ ब्रेन इन रिलेशन वीट वरियस पार्ट ऑफ बॉडी’ या शोधनिबंधातून बोटांच्या ठशांचा मोठ्या मेंदूशी असलेला संबंध स्पष्ट केला.
डरमेटोग्लायफिक्स ही परिपूर्ण आत्मचिकित्सा आहे. ज्याचा वापर करून अंगीभूत गुणांचा उत्कर्ष करता येतो. या शास्त्राचा उपयोग करून मुलांसाठी अभ्यासाचा योग्य क्रम व पद्धती समजून पालक व शिक्षक त्याचा वापर करून त्यांची प्रगती करू शकतात. अभ्यासाव्यतिरिक्त गुणांचाही विकास करता येऊ शकतो. वागण्यातील बारकावे लक्षात येतात. त्यामुळे एकमेकांच्या वागण्यातून होणारे गैरसमज दूर करून नातेसंबंध सुधारता येतात. त्याचे गणित, भाषा व रंगांची समज बोटांच्या व शरीराच्या हालचालीची कुवत संगीताची गोडी व इतर आवडी निवडी समजतात. त्याची पाच ज्ञानेंद्रिय किती प्रमाणात सक्षम आहेत. त्याची विचार करण्याची व अभ्यास करण्याची पद्धत कोणती आहे. त्याचा बुद्ध्यांक किती आहे. नेतृत्वगुण आहेत का? त्याने कोणत्या शाखेतून शिक्षण घ्यावे याची माहिती मिळते.
यासाठी आपण टेस्ट करून समुपदेशकची मदत घेऊ शकता. आज दीपक खाडेंसारखी मराठी माणसे ही या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. त्यांनी 2500 पेक्षा जास्त मुलांना 6-7 वर्षात समुपदेशन केले आहे, पण आपल्याला मराठी माणसाबद्दल खात्री वाटत नाही. गमंत म्हणजे त्याने आपले मराठी नाव लिहिले होते तर त्यांच्याकडे कोणी येत नव्हते त्यांनी आपले नाव के. दीपक लिहिल्यावर त्याच्याकडे पालकांची रांग लागली. आपले कसे आहे मी मराठीचा अभिमान… पण मराठी माणसाची मदत घेण्यात कमीपणा वाटतो. असा कोणताही कमीपणा न वाटता मुलांच्या भवितव्याचा योग्य निर्णय अनुभवी समुपदेशकाकडून घेतलेला चांगला अन्यथा पस्तावण्याची वेळ येऊ शकते.
-नितिन देशमुख