Breaking News

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, सायनाची शानदार सुरुवात

बासल ः वृत्तसंस्था

दोन वेळा रौप्यपदकावर नाव कोरणारी पी. व्ही. सिंधू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली. सिंधूने बुधवारी चायनीज तैपेईच्या पाय यू पो हिच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवत तिसर्‍या फेरीत मजल मारली, तर सायनाने नेदरलँड्सच्या सोराया डे विच आयबेर्गेन हिला सहज धूळ चारली.

बुधवारी पहिल्यांदाच कोर्टवर उतरत सिंधूने पाय यू पो हिच्यावर 43 मिनिटांत 21-14, 21-15 अशी सहज मात करत आगेकूच केली. सिंधूला उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या नवव्या मानांकित बेईवान झँग हिचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर आठव्या मानांकित सायनाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत दुसर्‍या फेरीचा सामना 21-10, 21-11 असा जिंकला. सायनाला पुढील फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफिल्ड हिच्याशी लढत द्यावी लागेल.

पाचव्या मानांकित सिंधूने पहिल्या गेममध्ये 5-5 अशी बरोबरी साधल्यानंतर 11-7 अशी आघाडी घेतली होती. सिंधूच्या सहजसुंदर खेळापुढे पाय यू पो हिचा निभाव लागत नव्हता. सिंधूच्या फटक्यांना प्रत्युत्तर देताना पाय यू पो हिचे फटके नेटवर जात होते. पाय यू पो हिच्या चुकांचा फायदा उठवत सिंधूने सहा गुणांची आघाडी घेत पहिला गेम सहजपणे आपल्या नावावर केला.

दुसर्‍या गेममध्येही सिंधूने 6-1 अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतर पाय हिने आपली रणनीती बदलली. तिने सिंधूला प्रदीर्घ रॅली करण्यावर भर दिला. त्यामुळे तिला 5-7 अशी पिछाडी भरून काढता आली. सिंधूकडूनही चुका होऊ लागल्यामुळे पाय हिला 11-10 अशी आघाडी घेता आली, पण त्यानंतर सिंधूने आपला खेळ उंचावत सहा गुणांच्या फरकाने विजयश्री मिळवली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply