Breaking News

काँग्रेस आमदार काशीराम पावरा भाजपमध्ये

गोपीचंद पडळकरही स्वगृही

मुंबई : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी सोमवारी (दि. 30) भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीचंद पडळकरही स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

मुंबईतील गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेतेही उपस्थित होते. या वेळी काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूर काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश केला, तर लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार राहिलेले गोपीचंद पडळकर यांनी घरवापसी केली. पडळकर हे बारामतीमधून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात लढणार असल्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवालही ‘कमळा’कडे आकर्षित नागपूर : शिरपूरचे काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे गोंदियातील आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. त्यामुळे सोमवारी (दि. 30) काँग्रेसला दुहेरी झटका बसला.

केजमधील उमेदवार नमिता मुंदडा भाजपत

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने केज विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंदडा यांनी ‘कमळ’ हाती घेतले. मुंदडा यांना केजमधून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

नमिता या राज्याचे माजी मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. त्यांना राष्ट्रवादीने केज मतदारसंघातून तिकीट दिले होते. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंदडा यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, मात्र त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

कै. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीपुढे नतमस्तक होत मुंदडा यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरामुळे आता राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply