रायगड जिल्ह्याला सांस्कृतिक वरदान लाभले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत येथील प्रज्ञावंतांनी कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. अफाट सौंदर्याने भरलेली वनश्री जशी रायगडला लाभली तसेच गंधर्वाच्या गोड गळ्यातील स्वरश्रीही इथल्या गायक कलावंतांना निसर्गत:च लाभली. त्यातून असाच एक स्वरप्रेमी वारकरी सांप्रदायाची पताका, शास्त्रीय संगीताचा वारसा सांभाळत समाजकार्य करता करता सांगीतिक वाटचाल करणारे संगीत सुरमयी व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित उमेश चौधरी.
आग्रा-जयपूर-अत्रोली घराण्याचे प्रतिनिधी व रायगड, नवी मुंबईतील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक व भजनगायक पंडित उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांच्या बहारदार गायनाने रसिकांना नेहमीच मोहित केले. मुळातच संगीताचा आत्मा त्यांच्या हृदयात कोरल्यामुळे संगीत व त्यांचे नाते भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी व रसिकांच्या आशीर्वादाने वृद्धिंगत झाले आहे.
शिक्षणात पदवीधर, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ’विशारद’ पदवी त्यांनी प्राप्त केली. दूरदर्शन, आकाशवाणी तसेच विविध कार्यक्रमात त्यांनी आपल्या सुरमयी कलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मासिक संगीत सभेच्या माध्यमातून पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेकडो कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. देशभरात विविध ठिकाणी संगीताचे कार्य करत असताना त्यांनी आपल्या कलेची छाप सोडली. त्यामुळेच त्यांना भीमसेन जोशी गानगंधर्व, रायगड भूषण, रायगड गौरव अशा पुरस्कारांनी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव झाला आहे.
खरं पाहता प्रत्येक मनुष्यदेहाचे संगीत कलेबरोबरचे नाते त्याच्या जन्मासोबतच सुरू झालेले असते. त्या कलेसोबत रुची वाढली की ओढ सुरू होते. वारकरी सांप्रदायानुसार ही ओढ फक्त प्रारब्धानुसार लाभत असते. उमेश यांचा जन्मच मुळी भजन परंपरा असलेल्या घराण्यात झाला. त्यामुळे त्यांना संगीताची आवड लहानपणापासून निर्माण झाली. भजन संगीत त्यांनी ऐकून शिकले असून शास्त्रीय संगीतही घरात ऐकूनच शिकले. उमेश यांचे वडील भजनपंडित श्री. निवृत्तीबुवा चौधरी मूळचे शास्त्रीय गायकच. त्यांनी पं. राम मराठे यांच्याकडे तब्बल 12 वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. त्यामुळे त्यांचे शास्त्रीय संगीताचे संस्कार व आग्रा घराण्याशी नातं आपोआपच जोडलं गेलं. लहानपणापासून ते पदवीधर होईपर्यंत तबला वादन करीत होते. आपल्या घराण्याला परंपरेने भजन संगीत, शास्त्रीय संगीताचा वारसा मिळाल्याने त्यांनी हा वारसा पुढे चालवायचा निश्चय करत गाण्याचे शिक्षण सुरू केले. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पै. उस्ताद अस्लम हुसैन खाँसाहेब यांच्याकडे तब्बल 10 वर्षे घेऊन आज उस्ताद अजीमखान व वडील निवृत्तीबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. प्रत्येक कलाकारास आपली कला कुठेतरी सादर करावयास मिळावी, चार लोकांनी ती ऐकावी, त्याची प्रशंसा करावी असे वाटते. प्रोत्साहन मिळाले, प्रशंसा झाली की कलाकार अधिक जोमाने रियाजाला लागतो म्हणूनच त्यांनी प्रथमतः स्वतःच्या घरीच मासिक संगीत सभा सुरू करून एक सामाजिक कार्य सुरू झाले. पुढे या कार्याचा वटवृक्ष झाला. कारण ही संगीत सभा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कृपाछत्राखाली सुरू झाली. आता ही संगीत सभा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व सांस्कृतिक सेलच्या बॅनरखाली सुरू असून भजन परंपरेला प्रोत्साहन मिळावे व कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या अखंड भजन महोत्सवाने विश्वविक्रम केला. त्यात उमेश चौधरी यांचाही सहभाग महत्त्वाचा ठरला. तसेच संगीताच्या माध्यमातून समाजात अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. संगीतकलेमार्फत सर्व आजारांवर उपचार पद्धती कशा प्रकारे फायदेशीर असते यासाठी ’म्युजिक थेरपी’सारखे उपक्रमही त्यांनी राबविले आहेत. सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात असणार्या दिवाळी पहाटचे दर्जेदार आणि यशस्वी आयोजन गेल्या 10 वर्षांपासून ते सातत्याने करीत आहेत. पुढील काळातही त्यांच्याकडून संगीतसेवा व्हावी आणि त्यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!