पनवेल : वार्ताहर
घरोघरी धार्मिक अनुष्णनांच्या माध्यमातून भक्तीचे दीप उजळणारे पुरोहित लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहे. धार्मिक विधींच्या माध्यमातून घराघरांना चमक देणार्या या पौरोहित्य करणार्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. या वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची हाक पनवेलमधील पुरोहितांकडून देण्यात आली होती. त्या हाकेला साद देत पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टने पुढाकार घेऊन शनिवारी (दि. 25) परिसरातील पुरोहितांना धान्याचे वाटप करण्यात आले. पनवेल परिसरात पौरोहित्य करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. पौरोहित्यावरच ही मंडळी आपले संपूर्ण आयुष्य घालवते. मुंज, विवाह, वास्तुशांती, सत्यनारायण पूजेपासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत प्रत्येकाचे पुरोहित वेगळे आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे सगळेच घरातल्या घरात बंद झाले आहेत. सगळे सोहळे रद्द अथवा स्थगित झाल्याने पुरोहितवर्ग वंचित झाला आहे. हा वर्ग चिंतीत असल्याने पनवेलमधील पुरोहित दीपक दीक्षित यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची हाक दिली होती. त्यानुसार पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट या संस्थेने पुरोहितांच्या हाकेला साद देत शुक्रवारी पुरोहितांना धान्याचे वाटप करण्यात आले.
रसायनीत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू यशस्वी; नागरिकांचे सहकार्य
मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनीपासून काही किलोमीटरवर असणार्या पनवेल परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने रसायनीत कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने शुक्रवार व शनिवार दि. 24 व 25 रोजी स्वयंस्फूर्तींने जनता कर्फ्यूचे पालन केले. याला व्यापारी असोसिएशनने व रसायनीकरांनी पाठिंबा दिला. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने परिसरात जंतुनाशक औषध फवारणी केली. नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठेत किराणा व भाजीपाला केंद्रांत बदल, जंतुनाशक फवारणी, स्पीकरद्वारे गावोगावी नागरिकांना घरात राहण्याकरीता आवाहन करण्यात येत आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी वर्गांने व परीसरातील काही जीवनावश्यक सेवा बजावणार्यांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना साखळी तोडण्यासाठी परीसरातील सर्व दुकानदारांनी एकदिलाने सामील होवून 24 व 25 एप्रिलला जनता कर्फ्यू पाळत आहेत. यात शुक्रवारी परिसरात शुकशुकाट जाणवला.
वारांगनांना रेशन किट्सचे वाटप
पनवेल : बातमीदार
वारांगना हा घटक समाजातील अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित असा एक घटक आहे, ज्याच्याकडे सर्वसामान्य नागरिक जाण्यास धजावत नाही. या महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शरीरविक्रय करुन लाजिरवाणे जीवन जगत आहेत. कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी या महिलांना 60 रेशन किट्स उपलब्ध करुन दिले आहेत. शासनाकडून सर्व कष्टकरी, मजूरवर्गीय जनतेला विविध प्रकारच्या माध्यमातून मदत होत आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड, आधारकार्ड आहेत त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत आहे. परंतु वारांगना या घटकातील महिला शासनाच्या लाभापासून वंचित आहेत, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. मात्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी ही बाब जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी चौधरी यांनी तत्काळ जिल्ह्यात या महिला कोठे आहेत, किती आहेत याची सविस्तर माहिती व शोध घेण्यासाठी गायकवाड यांना सूचित केले. त्यानंतर पनवेल शहर, मुंबई-पुणे महामार्गालगत साधारणत: 175 ते 200 शरीरविक्रय करणार्या महिला आढळून आल्या. या महिलांची यादी व मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर केल्यावर त्यांनी विनाविलंब पनवेल तहसीलदार अमित सानप यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गायकवाड यांच्याशी समन्वय साधून या महिलांना कोणत्याही रेशनकार्ड, आधारकार्डची सक्ती न करता आवश्यक ती सर्व मदत तातडीने करण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार पनवेल तहसीलदार अमित सानप यांनीही तत्परतेने कार्यवाही करत या महिलांना 60 रेशन किट्स उपलब्ध करुन दिले.