Breaking News

जनता बंदला पेणकरांचा 100 टक्के प्रतिसाद; नगराध्यक्षांनी मानले आभार

पेण : प्रतिनिधी

पेण शहरात मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेणमधील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी व नगर परिषद प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत पेणकरांनी चार दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत 100 टक्के बंद पाळून पेणकरांनी तसेच ग्रामीण भागातील जनतेने प्रतिसाद दिल्याने नगराध्यक्षांनी जनतेचे आभार मानले आहेत.

मागील आठवड्यात पेण शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर शहरातील वाढत्या गर्दीविरोधात प्रशासनाने भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती. शहरातील नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून बंद केल्याने नागरिकांनी बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिल्याचे चित्र शहरात दिसून आले. मुख्य बाजारपेठ व आजूबाजूच्या परिसरातील दुकानदारांनी बंद पाळल्याने शहरासह ग्रामीण भागातून येणार्‍या जनतेच्या संख्येमध्ये मोठी घट झाली. जनता कर्फ्यूच्या काळात शहरातील बहुतांश दुकाने तसेच हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद होता. सकाळी काही काळासाठी सुरू झालेली दुकाने दुपारनंतर बंद करण्यात येत होती.

आगामी काळात शासनाने दिलेल्या आरोग्यविषयक निर्देशांचे व सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात काही प्रमाणात यश आल्याची भावना व्यक्त करण्यात

येत होती. एकूणच चार दिवसीय जनता कर्फ्यूला पेणकरांच्या वतीने देण्यात आलेला पाठिंबा पाहता नागरिकांत आपल्या आरोग्याविषयक अधिक जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply