नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहचले आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेले महत्त्वाकांशी चांद्रयान-2 शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे 5.30 ते 6.30 वाजेदरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे. श्रीहरिकोटा येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. चांद्रयान-2चे स्वतंत्रपणे भ्रमण सुरू असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा 15 मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत. पूर्वनियोजित मार्गावरून या यानाने तीन लाख 84 हजार किमीचे अंतर कापले आहे. विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद सहा किमी किंवा प्रतितास 21 हजार 600 किमी असा आहे. त्यानंतर 15 मिनिटांनी विक्रमचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद राहणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील भारताचे हे प्रथमच अवतरण असेल. यापूर्वी चंद्रावर मानव अथवा यंत्र केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच उतरविले आहे. चांद्रयान-2चा आतापर्यंतचा प्रवास सुरळीत होता. पाच महिन्यांपूर्वी इस्राइलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. कारण त्यांच्या यानाचा वेग पुरेसा मंदावला नसल्याने ते कोसळले होते.
जगाला वैज्ञानिकांची ताकद दिसेल -पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. 130 कोटी भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. आणखी काही तासांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. संपूर्ण जग आमच्या अवकाश संशोधकांचे कौशल्य आणि ताकद पाहिल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बंगळुरुमधील इस्रोच्या सेंटरमधून भारताच्या अवकाश कार्यक्रमाच्या इतिहासातील हा खास क्षण पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. लँडिंगचा क्षण पाहण्यासाठी भारताच्या वेगवेगळ्या भागातून तरुण मंडळीसुद्धा या वेळी उपस्थित असतील. भूतानवरूनसुद्धा काही तरुण येणार आहेत. इस्रोने अवकाशासंबंधी घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिंकलेली मुले मोदींसोबत या वेळी हा खास क्षण पाहण्यासाठी इस्रोच्या सेंटरमध्ये असणार आहेत. या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागातून त्यांची विज्ञान आणि अवकाशाबद्दलची आवड दिसून येते. हे खूप चांगले लक्षण आहे.