मुंबई ः प्रतिनिधी
‘अशिक्षितपणा, असंस्कार, अनाचार सोडा आणि नव्या विचारांनी नवा भारत जोडा,’ असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाईला दिला. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असली तरी देशांतर्गत परिस्थिती उत्तम असून येत्या तीन ते सहा महिन्यांत देश आर्थिक प्रगतीत पुन्हा आघाडी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांसमोर त्यांनी देशातील युवा पिढीकडून असलेल्या अपेक्षांची मांडणी केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. आयआयएमयूएनद्वारे आयोजित इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट फॉर युनाईट नेशन्स या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक रिषभ शहा या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध गायक लुईस यांच्या समवेत राष्ट्रगीत गायले, तर शेवटी ‘राष्ट्र विजयी हो हमारा’ ही कविता म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आपली संस्कृती आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या आपल्या सुप्रसिद्ध भाषणात याचीच महती सांगितली होती. हाच विचार तरुणांमार्फत विश्वात पसरविण्यासाठी हे व्यासपीठ उपयोगी ठरणार आहे. सध्या आपल्या देशात सर्वाधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. या तरुण लोकसंख्येचा उपयोग मानव संसाधन म्हणून करणे आवश्यक आहे. यापूर्वी युरोप, जपान, कोरिया आणि चीन या देशांना त्यांच्या देशात असलेल्या तरुणांच्या या लोकसंख्येचा फायदा घेता आला आहे. आपला देश पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. त्यात राज्याने हे एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात मुंबईची मोठी भूमिका असणार आहे. हे करीत असताना राज्यातील 40 हजार गावांमध्ये विकास करायचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणातूनच हे साध्य होणार आहे. त्यासाठी लागणारे कौशल्य प्रशिक्षणही आवश्यक आहे. स्वतःच्या उद्धाराबरोबरच समाजातील एकातरी व्यक्तीच्या चेहर्यावर हास्य फुलविण्याची जबाबदारी आजच्या प्रत्येक युवकाने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांवरील प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरे दिली.