Breaking News

उदयनराजे, हर्षवर्धन, गणेश नाईक आणि भास्करराव : एक वर्तुळ पूर्ण!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 2014 पेक्षाही घवघवीत यश मिळाले. मोदी सरकार-2 अस्तित्वात आले. या सरकारने केवळ शंभर दिवसात जी नेत्रदीपक कामगिरी बजावली आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवितानाच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील 370वे कलम रद्द करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात खणखणीत आणि दणदणीतपणे मांडली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातील मोठी चूक 70 वर्षानंतर मोदी आणि शाह यांच्या जबरदस्त नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने धाडसाने दुरुस्त करून नवा इतिहास घडविला.

मोदी आणि शाह यांच्या या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक भूमिकेचे सर्वच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे कुंपणावर बसणे पसंत केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याची संधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चालून आली होती, परंतु पंडितजींच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी सोनिया राहुल यांच्या डोळ्यांवर असल्याने गांधारी बनण्याची भूमिका यूपीएच्या चेअरपर्सनना वठवावी लागली, परंतु राजा हरीसिंह पुत्र करणसिंह, शशी थरूर, जनार्दन द्विवेदी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या 370 कलम रद्द करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री आणि शरदरावांचे पुतणे अजित पवार यांच्यासह अनेकांनी मोदी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

मोदी सरकारचा करिष्मा फैलावू लागला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ होऊ लागला तसे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे येणार्‍या नेत्यांचा ओघही वाढू लागला. 2014 पासूनच तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना ओहोटी, गळती लागली होती. ती ओहोटी, गळती पुढेही सुरू राहणे हे ओघाने आलेच, पण शरद पवार आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना जो जबरदस्त फटका बसला. त्याची या दोन्ही पक्षांच्या नेतृत्व करणार्‍या दिग्गज नेत्यांनी कधी कल्पनाच केलेली नसेल. एका अर्थाने जे दिग्गज नेते आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत येत आहेत त्यांच्या येण्याने युती-महायुतीच्या प्रवेशाने या नेत्यांनी एक वर्तुळ पूर्ण केले आहे असेच म्हणावे लागेल. शनिवार, 14 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कार्याध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. तत्पूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपल्या सातारा लोकसभा सदस्यत्वाचे त्यागपत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले.

सध्या महाराष्ट्रात शिवशाही दोन हे सरकार कार्यरत असून शिवशाही तीनच्या स्वागतासाठी औपचारिकता शिल्लक आहे. डॉ. मनोहर गजानन जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही एक सरकार 14 मार्च 1995 रोजी अधिकारारूढ झाले. 1999 साली असुरी महत्त्वाकांक्षा आणि फाजील आत्मविश्वास यामुळे दोन्ही काँग्रेसच्या हाती सत्ता गेली, परंतु शिवशाही एकच्या कार्यकाळात छत्रपती उदयनराजे भोसले, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील, भास्करराव जाधव अशी नेतेमंडळी सरकारमध्ये किंवा सरकारी उपक्रमांमध्ये सहभागी होती. उदयनराजे महसूल राज्यमंत्री होते. राधाकृष्ण विखे-पाटील कृषिमंत्री होते, गणेश नाईक वन आणि पर्यावरण मंत्री होते, भास्करराव जाधव यांनी झुंझार आमदार म्हणून भूमिका निभावली होती.

विशेष म्हणजे शिवशाही एक हे सरकार शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि 45 अपक्ष आमदार यांच्या सहकार्याने सत्तारूढ झाले होते. आज शिवशाही दोनच्या अखेरीस आणि शिवशाही तीनची चाहूल लागताना सातारचे राजे उदयनराजे भोसले, गणेश नाईक आणि डॉ. संजीव नाईक हे पितापुत्र, हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले, तर भास्करराव जाधव यांनी पुनश्च हरी ओम करीत जुने ‘गिले शिकवे’ दूर करून मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधले. उदयनराजे भोसले, गणेश नाईक आणि भास्करराव जाधव यांनी शरद पवार यांच्या पक्षाला राम राम ठोकला, तर शरद पवार यांच्या राजकारणावर घणाघाती प्रहार करीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या ‘हाता’ला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. हर्षवर्धन पाटील हेसुद्धा शिवशाही एकमध्ये राज्यमंत्री होते आणि 1995 साली पवार विरोधकांची फौज विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविली होती. त्या फौजेचे अग्रणी होते शंकरराव बाजीराव पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील, डॉ. विजयकुमार गावित, अशोक पाटील-डोणगांवकर, अनिल देशमुख हे अपक्ष आमदार शिवशाही एक मध्ये राज्यमंत्री होते. मध्यंतरी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना राजकीय टोलेबाजी केली होती. हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते आणि मिश्किलपणे भाषणात नितीन गडकरी यांनी कोपरखळी मारली. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहात गडकरी म्हणाले होते की, तुयचं काय बाबा, उद्या आमचंच सरकार आल्यावर तुम्ही आमच्या सरकारमध्ये मंत्री असाल. कालचक्र कसं फिरतं पाहा, आज नितीन गडकरी यांनी काढलेले उद्गार खरे ठरताहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी फलटणमध्ये समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तूर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सांगितले, पण उद्याचे सांगता येत नाही, असेही स्पष्ट केले. शरद पवार यांच्या या वयात त्यांची साथ सोडणे जीवावर येत असल्याचे सांगितले. अर्थात त्यांच्या चिरंजीवांच्या राजकीय भवितव्यासाठी ते उद्या त्याला शिवबंधन बांधून पुढे मार्गक्रमण करायला लावू शकतील, अशी चर्चा आहे. शिवशाही एकच्या काळात रामराजे कृष्णा खोरे महामंडळाचे नेतृत्व करीत होते.

या सर्वच राजकीय घडामोडी पाहता या तमाम नेत्यांनी एक वर्तुळ पूर्ण केल्याचे किंबहुना करीत असल्याचे म्हणावे लागेल. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांतिकारी संघटना, जनसुराज्य पक्ष अशा मित्रपक्षांच्या महायुतीचे सरकार पुनश्च अधिकारारूढ व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे सामंजस्याने एकेक पाऊल टाकत आहेत. त्यांना आदित्य ठाकरे, रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे ही नेतेमंडळी सक्रीय साथ देत आहेत. ‘हम तो आगे चल रहें हैं और कारवाँ बढता गया!’ या न्यायाने उदयनराजे भोसले, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, भास्करराव जाधव आणि असंख्य नेते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूत्रानुसार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ याप्रमाणे आगेकूच करावी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या अनुषंगाने निवडणूक ही तर आता एक औपचारिकता शिल्लक आहे. महाराष्ट्रातील जनतेने आदेश (जनादेश) दिलेलाच आहे, असे सांगितलेले आहे. असे असले तरी शत्रू दबा धरून बसला आहे, असे समजून गाफील न राहता डोळ्यात तेल घालून कंबर कसून निवडणुकीच्या रणांगणावर उतरावे. सत्तेची वरमाला आपल्या गळ्यात घालण्यासाठी उभी आहे. एकमेकांची उणीदुणी न काढता सहकार्य, समन्वय, सौहार्द आणि सामंजस्य या चतुःसूत्रीनुसार कार्य करावे. शिवशाही तीनच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवावेत. बिनकामाच्या तलवारी उपसल्याशिवाय मित्रपक्षांना सोबत घेऊन वाटचाल करावी, हा मोठा तो मोठा या भ्रामक कल्पनांच्या मागे न धावता खांद्याला खांदा लावून काम करावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे. विरोधी पक्ष हा चाचपडतोय त्याला चाचपडू द्या, मोदी आणि फडणवीस सरकारने केलेल्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक कामांची शिदोरी मोठी आहे, त्या जोरावर सत्ता सहजपणे टिकविता येईल, ती टिकविण्यासाठी प्रयत्न करा. बाकी लई मागनं न्हाई! मनःपूर्वक शुभेच्छा!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply