अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील उसर येथे केंद्र सरकारच्या अखत्यारीत उसर येथील गेल कंपनीच्या पॉलीप्रोपलिन प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील या प्रकल्पासाठी आठ हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पाच्या निमित्ताने केली जाणार आहे. तीन वर्षांत प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक अनुप गुप्ता यांनी व्यक्त केला.
सध्या देशात पॉलीप्रोपलीनची मागणी 5480 केटीए येवढी आहे. 2030पर्यंत ही मागणी दुप्पट होणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारत सरकारने मेक इन इंडीया उपक्रमा आंतर्गत पॉली प्रोपलीन निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले आहे. याच धोरणा आंतर्गत गेल कंपनी मार्फत उसर येथे 500 केटीए प्रती दिवस क्षमतेचा पॉली प्रोपलीन प्रकल्प उभारला जाणार आहे. उत्तर प्रदेश आणि आसाम नंतर गेल कंपनीचा हा देशातील तिसरा आणि आशिया खंडातील सर्वात मोठा पॉली प्रोपलीन प्रकल्प असणार आहे.
उसर येथे पूर्वी गॅस प्रकल्प कार्यान्विय होता, मात्र गॅस पुरवठा बंद झाल्याने हा प्रकल्प बंद पडला होती. त्यामुळे कंपनीकडे असलेली जागा पडून होती. आता याच 130 हेक्टर जागेत पॉली पीडीएच टेक्नॉलॉजीवर आधारीत पॉली प्रोपलीन प्रकल्प उभारला जात आहे. याशिवाय एमआयडीसीकडे असलेली 60 हेक्टर जागा अजून मिळावी यासाठी कंपनीने मागणी केली आहे. प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर 230 जणांना थेट तर जवळपास दिड हजार लोकांना कंत्राटी पध्दतीने रोजगार उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प पूर्णतः प्रदुषण विरहीत असणार असून कुठल्याही प्रकारचे सांडपाणी उत्सर्जन प्रकल्पातून होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे अलिबागमधील अर्थकारणाला गती मिळेल असा विश्वास पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी व्यक्त केला. या वेळी महाव्यवस्थापक विरेंद्र गुप्ता, प्रवीण लोखंडे आणि जितेन सक्सेना हेदेखील उपस्थित होते.