उरण : रामप्रहर वृत्त
राज्याच्या किनारपट्टीवर सध्या आर्थिक संकटाचे ढग दाटून आले आहेत. अरबी समुद्रात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मासेमारीतील नैसर्गिक अडथळे ऑक्टोबपर्यंत कायम राहिल्याने मच्छीमारांच्या हातातोंडचा घास हिरावला गेला आहे. ‘क्यार’ वादळ सरून गेल्यानंतर आता पुन्हा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने मच्छीमारांची अर्थनौका वादळात सापडली आहे. 15 दिवसांपासून समुद्रातील मासेमारी बंद राहिल्याने मासेमारी जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे पालघर, वसईसह उरण आणि आजूबाजूच्या किनारपट्टी गावांतील मासळीत कमालीची घट झाली आहे. याचा मोठा फटका दरांवर होऊ लागला आहे. मासळी खाणे खवय्यांनाही परवडेनाशी झाली आहे. ही स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास मच्छीमारांना गुजराण करण्यापुरतीही कमाई करणे शक्य होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालघर, वसई आणि उरण पट्ट्यातील मच्छीमारांना शासनाकडून मिळणारे गेल्या काही महिन्यांपासूनचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. यंदा पावसाळ्यातील दोन महिन्यांच्या मासेमारीवरील बंदीनंतर मासेमारांना चांगले दिवस येतील, अशी आशा होती, मात्र पावसाळा लांबला, तसेच वादळी वार्यांचा प्रभावही वाढल्याने मासेमारीवर परिणाम झाला असल्याची माहिती मच्छीमार नेते सीताराम नाखवा यांनी दिली. चक्रीवादळाचे सावट असल्याने मासेमारी बोटी किनार्यावर नांगरण्यात आल्या आहेत. परिणामी मासळीची आवकही घटली आहे. त्यात ग्राहकांनीही महागड्या मासळीकडे पाठ फिरवली आहे.