Breaking News

धोनीचा क्रिकेटमधील टाइम संपलाय : गावसकर

मुंबई : प्रतिनिधी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा जोरावर असतानाच माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीचा टाइम आता संपलाय. टीम इंडियाने आता त्याच्या पलीकडे पाहायला हवे,’ असे गावसकर यांनी म्हटलंय.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर यांनी हे वक्तव्य केले. ‘धोनीच्या मनात काय आहे हे सध्यातरी कुणालाच माहीत नाही. भारतीय क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याबद्दल केवळ तोच सांगू शकतो, पण मला वाटते आज तो 38 वर्षांचा आहे. भारतीय संघाने आता पुढचा विचार करायला हवा, कारण पुढील टी-10 विश्वचषकापर्यंत तो 39 वर्षांचा असेल,’ असे गावसकर म्हणाले.

‘धोनी संघात असणे आजही फायदेशीर आहे हे खरे आहे. तो किती धावा करतो किंवा यष्टीमागे कशी कामगिरी करतो, यापेक्षा मैदानात त्याचे असणे हे संघाच्या कर्णधाराला धीर देणारे असते. त्याच्या सल्ल्याचा मोठा फायदा होतो. असे असले तरी आता ती वेळ (निवृत्तीची) आलीय. भारताला दोनदा विश्वचषक विजयाचा मान मिळवून देणार्‍या धोनीने सन्मानाने जायला हवे,’ असे गावसकर म्हणालेे.

न्यूझीलंड विरुद्ध पराभव होऊन भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यापासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. भारत-वेस्ट इंडिजच्या मालिकेतूनही त्याने माघार घेतली होती. सध्या सुरू असलेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याचा

समावेश नाही. त्यामुळे धोनीची निवृत्ती हा सध्या भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर गावसकर यांचे मत चर्चेत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply