पनवेल : वार्ताहर
अमली पदार्थांची विक्री करण्याबरोबर सेवन करणार्यांवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पनवेलमध्ये गांजा ओढणार्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमली पदार्थांची विक्री करणारे सर्व अड्डे तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यान, मोकळ्या इमारती व इतर ठिकाणी अमली पदार्थ सेवन करणार्यांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये खाडीजवळ काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती पोलीस नाईक अमरदीप वाघमारे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांना सोबत घेऊन खाडीकिनारी छापा टाकला. तेथे तीन तरुण बिडीमध्ये गांजा टाकून त्याचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पनवेल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांनी गांजा ओढल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तीन तरुणांवर एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 क 27 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी अशाप्रकारे कारवाया केल्या जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले आहे. शहर अमली पदार्थमुक्त करण्यासाठी उद्यान व इतर ठिकाणी अमली पदार्थ ओढत बसणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.