Sunday , October 1 2023
Breaking News

रमजानमध्ये शुक्रवारी मतदान नाही ः निवडणूक आयोग

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता धार्मिक वातावरणही तापू लागले आहे. राज्यात चार टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. 11 ते 29 एप्रिल या काळात मतदान होणार आहे, परंतु रमजानमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याच्या निर्णयाला अनेक पक्षांनी विरोध केला असतानाच निवडणूक वेळापत्रकाबाबत निवडणूक आयोगाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रमजानच्या पवित्र काळात कोणत्याच सणाच्या दिवशी किंवा शुक्रवारी मतदान होणार नाही. त्याचबरोबर रमजानच्या पूर्ण महिन्यात निवडणूक रद्द करणे शक्य नाही, असेही आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे. 2 जूनपूर्वी नवे सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. एका महिन्यात निवडणुका होणे शक्य नव्हते. त्यामुळे कोणत्याच शुक्रवारी किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी मतदान होणार नाही ही बाब लक्षात घेण्यात आली. या तारखा बदलणे किंवा निवडणुकीचा काळ पुढे ढकलण्याचा पर्याय आमच्यासमोर नव्हता, असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशात रमजानच्या काळात मतदान होणार आहे. काही मुस्लीम नेते आणि मौलवींनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी मतदानाच्या तारखा बदलण्याची मागणीही निवडणूक आयोगाकडे केली आहे. कोलकात्याचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम यांनीही तारखांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था आहे. तिचा आम्ही सन्मान करतो. निवडणूक आयोगाविरोधात काही बोलायचे नाही, पण सात टप्प्यांत होणार्‍या निवडणुका बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या नागरिकांसाठी त्रासदायक आहेत. सर्वात जास्त अडचणी मुस्लिमांसमोर असणार आहेत. कारण मतदानाच्या तारखा रमजानच्या महिन्यातील आहेत, असा मतप्रवाह मुस्लीम समाजात होता.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply