मुंबई : प्रतिनिधी
राहुल चहर (3/5) आणि चंद्रपाल सिंग (3/21) या फिरकी जोडीने केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर राजस्थानने सोमवारी (दि. 26) सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील सामन्यात गतउपविजेत्या महाराष्ट्राला सहा गडी आणि 22 चेंडू राखून धूळ चारली.
तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करणारा महाराष्ट्राचा संघ सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानी असून, उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा धुसर झाल्या आहेत. बुधवारी अग्रस्थानावरील हरयाणाविरुद्धच्या लढतीत त्यांना मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राजस्थान-दिल्ली निकाल महत्त्वाचा आहे.
प्रथम फलंदाजी करताना चहर आणि चंद्रपाल यांच्या फिरकीपुढे महाराष्ट्राचा डाव 20 षटकांत 9 बाद 99 धावांवर आटोपला. निखिल नाईक (23) वगळता केदार जाधव (10), ऋतुराज गायकवाड (17) आणि कर्णधार राहुल त्रिपाठी (3) हे अनुभवी फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
प्रत्युत्तरात राजस्थानची एक वेळ 4 बाद 61 धावा अशी अवस्था झाली होती, मात्र मणिपाल लोमरोर (नाबाद 35) आणि अंकित लांबा (33) यांनी संयमी फलंदाजी केल्यामुळे राजस्थानने 17व्या षटकात विजय मिळवला. संक्षिप्त धावफलक महाराष्ट्र : 20 षटकांत 9 बाद 99 (निखिल नाईक 23; राहुल चहर 3/5, चंद्रपाल सिंग 3/21) पराभूत वि. राजस्थान : 16.2 षटकांत 4 बाद 101 (मणिपाल लोमरोर 35, अंकित लांबा 33; शम्सुझमा काझी 1/13).