खोपोली : प्रतिनिधी
मुंबई – पुणे महामार्गावर बोरघाटातील मेकॅनिकल पॉईंटजवळ मैदा भरलेल्या पोत्यांचा ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली, ही वाहतूक अन्य मार्गांनी वळवावी लागली.
मैद्याची पोती भरलेला ट्रक पुण्याकडून मुंबईकडे जात होता.बोरघाटातील मेकॅनिकल पॉईंटजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यातच आडवा झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातग्रस्त ट्रकमधील मैद्याची पोती महामार्गावर पसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.
अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम घटनास्थळी दाखल झाली. महामार्गावर पसरलेली मैद्याची पोती अन्य वाहनातून हलविल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक हलविण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.