Breaking News

पोलादपूरमध्ये बैलदिवाळीनिमित्त मर्दानी खेळाचा थरार

पोलादपूर : प्रतिनिधी

दक्षिण भारतात जलिकट्टू आणि युरोपियन देशांमध्ये बुलफाईट सर्वांना ज्ञात असताना पोलादपूरच्या ग्रामीण भागात बैलदिवाळीच्या पारंपरिक मर्दानी खेळाचे आकर्षण चाकरमानी आणि स्थानिकांमध्ये आजही कायम आहे. दिवाळीनंतर मंगळवारी देवदिवाळी झाली आणि ग्रामदैवतांचा कौल घेऊन देणे देऊन बुधवारी मार्गशीर्ष प्रतिपदेला बैलदिवाळीची प्रथा सुरू झाली.

पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागाने जपलेली ही बैलदिवाळीची परंपरा शेतकर्‍यांना उपयुक्त असलेल्या मुक्या जनावरातील मरगळ व अकड दूर करण्याचा प्रयत्न आहे. चौखूर उधळणे, शिंगे रोकणे आणि वारा पिऊन बेभान होण्याचे पिसाटल्यागत वर्तन या बैलदिवाळीनंतर बैलांमध्ये शिल्लक राहात नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

या वेळी बैलांना सजवून शेताच्या खाचरांमधून नाचविण्यात येते. बैल उतरविताना शेतकरी असेल तर तो स्वत:कडे बैलाची वेसण धरतो आणि चाकरमानी असेल तर दोन वेसणी लावून एक चाकरमान्याच्या, तर दुसरी वेसण शेतकर्‍याकडे ठेवली जाते. बैलाची वेसण ओढली की तो पुढच्या पायावर झुकून उडी मारतो. असे अनेकदा केले की बैल नाचतोय असे वाटू लागते. या नाचणार्‍या बैलाचे उधळणे झाले की, ग्रामस्थ त्याच्याभोवती काठ्या घेऊन फिरतात. या काठ्यांच्या टोकाला बकरीच्या अंगावरील केसांच्या झुपक्यांसह चामडे असते. यामुळे या बैलाला शिंकेची भावना होऊन तो मान जोरात खाली वर करतो आणि काठी समोर आणणार्‍यावर शिंग रोखून धरतो. बैलांची ही प्रतिक्रिया त्यांची मरगळ व अकड निघण्याचे द्योतक मानले जाते. काही ठिकाणी या उधळलेल्या बैलाच्या शिंगावरचे झुपकेदार तुरे जो कोणी तरुण काढतो त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद त्याच्या मर्दूमकीला साजेसाच असतो. ही सारी धमाल बैलदिवाळीच्या निमित्ताने यंदाही पहायला मिळाली.

पोलादपुर तालुक्यातील आडावळे खुर्द, आडावळे बुद्रुक, एरंडवाडी, ऊमरठ, मोरसडे गावच्या 12 वाड्या, बोरघर, कामथे आणि अन्य गावांत बुधवारी दुपारी बैलदिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply