मुंबई : प्रतिनिधी
कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे, मात्र त्यापूर्वीच पुन्हा एकदा ‘आदर्श’ची चौकशी सुरू झाल्याने चव्हाण यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
ईडीने आदर्श घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. ईडीचे अधिकारी बुधवारी (दि. 27) कुलाबा येथे आदर्श गृहनिर्माण संस्थेत पोहोचले आणि त्यांनी त्यातील घरांची मोजणीही केली. याबाबत अद्याप कोणत्याही अधिकार्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010मध्ये चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारला यावरून मोठी नामुष्की सहन करावी लागली होती.
चव्हाण यांनी आदर्श सोसायटीला अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर करून तेथील दोन फ्लॅट कुटुंबीयांसाठी घेतले, तसेच ही सोसायटी कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बांधली जात असताना तेथील 40 फ्लॅट सर्वसामान्य नागरिकांना देण्यासही महसूलमंत्री असताना त्यांनी परवानगी दिली, असा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात करण्यात आला होता.