रविवार, 6 डिसेंबर 1992! नवी दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी भारताचे पंतप्रधान पामलू वेंकट नरसिंहराव हे सकाळी सात वाजताच उठून आपला प्रातर्विधी उरकून कामाला लागतात. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम. त्या दिवशी रविवार असल्याने थोड्या उशिरा उठले असावेत. त्यांचे व्यक्तिगत वैद्यकीय अधिकारी डॉ. के. श्रीनाथ रेड्डी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी रक्त आणि लघवीचे नमुने घेतले. रक्तदाब तपासला आणि तेथून निघाले.
घरी जाऊन डॉ. रेड्डी यांनी बातम्या ऐकल्यावर ते एकदम अस्वस्थ झाले. तत्काळ त्यांनी पंतप्रधान नरसिंहराव यांचे घर गाठले. अचानक परतलेल्या डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांना पाहून पंतप्रधान संतापले. काय झाले? परत का आलात? प्रश्नांची सरबत्ती केली. डॉ. रेड्डी यांनी राव यांना शांत केले. त्यांचा रक्तदाब वाढला होता. रागाने ते लालबुंद झाले होते. दुपारी एक वाजून 55 मिनिटांनी बाबरी मशिदीच्या तीन घुमटांपैकी एक हजारोंच्या संख्येने आलेल्या रामभक्तांनी धराशायी केला होता.
नरसिंहराव यांचे एक सहकारी माखनलाल फोतेदार यांनी नरसिंहराव यांना फोन करून या रामभक्तांवर अश्रूधूर सोडण्याचा सल्ला दिला. ’काय? मी असं करू शकतो?’ असा एकदम निरागस सवाल पंतप्रधान नरसिंहराव यांनी फोतेदार यांना केला. बाबरीचा किमान एखादा घुमट आपण वाचवून आणि तो काचेच्या घरात ठेवून काँग्रेसने बाबरी वाचवण्यासाठी प्रयत्न केला आहे असे तरी दाखविता येईल, असे माखनलाल फोतेदार यांनी नरसिंहराव यांना काकुळतीच्या स्वरात सांगितले.
नरसिंहराव हे प्रकांडपंडित होते. त्यांना सुमारे 14 भाषा अवगत होत्या. माखनलाल फोतेदार यांच्या या दाव्याची संपूर्ण माहिती फोतेदार यांच्या ’दि चिनार लिव्ज’ या आत्मचरित्रात आहे, पण ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की, बाबरी मशीद पडली त्या संपूर्ण कालावधीत नरसिंहराव हे देवपूजा करीत होते. बाबरीच्या पाडण्याच्या सुरुवातीला नरसिंहराव जे पूजेला बसले ते बाबरी धराशायी होईपर्यंत ते पूजाच करीत होते. ज्या वेळी त्यांना सांगण्यात आले की बाबरी संपूर्ण पाडली गेली आहे, तेव्हा नरसिंहराव यांनी आपली पूजा संपविली. ही बाब कुलदीप नायर यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांच्या कानावर घातली. अर्जुनसिंह या नरसिंहराव यांच्या सहकारी
मंत्र्यांनीसुद्धा या बाबीचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा सी. के. जाफर शरीफ हे संतापले आणि याची किंमत काँग्रेस पक्षाला मोजावी लागेल, असा इशाराही दिला होता. संपूर्ण बैठकीत नरसिंहराव हे अगदी शांतपणे बसले होते. माखनलाल फोतेदार हे या बैठकीत ढसाढसा रडल्याचेही सांगण्यात येते. नरसिंहराव यांना राममंदिर बांधायचे होते आणि त्यांनी रामालयची स्थापना केल्याचेही सांगण्यात येते. ही संपूर्ण नोंद गुजराती पत्रकार आणि अभिनेत्री जिग्ना नारायणभाई त्रिवेदी यांनी गुजरात मित्र लाईव्हच्या एका खास वृत्तांतामध्ये नमूद केली आहे. हा वृत्तांत नुकताच ऐकायला मिळाला.
9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय यशवंतराव चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नझीर या पाच न्यायमूर्तींनी एकमताने अयोध्या येथील रामजन्मभूमीसंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि पाच एकर जमीन मुस्लिम समाजाला मशीद उभारणीसाठी देण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला. शेकडो वर्षे चाललेल्या वादाची 9 नोव्हेंबर 2019 या दिवशी पूर्णाहुती झाली. हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल. ’मोदी हैं तो मुमकीन हैं’ याची प्रचिती या निकालानंतर आली.
अटलबिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून भारताचे पंतप्रधान असताना अयोध्येतील राममंदिर, धारा 370, समान नागरी कायदा हे महत्त्वाचे मुद्दे भारतीय जनता पक्षाने किमान समान कार्यक्रम आधारित सरकार चालविण्यासाठी बाजूला ठेवून कामकाज केले, परंतु आता नरेंद्र दामोदरदास मोदी हे 2014मध्ये 543 पैकी 282 आणि 2019मध्ये तब्बल 303 असे सुस्पष्ट बहुमत घेऊन केंद्रात सत्तेवर आल्यानंतर वाजपेयी यांच्या काळात बाजूला सारलेले महत्त्वाचे तीनही मुद्दे मार्गी लागायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी दुसर्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे घेऊन काही दिवसांतच 370चा प्रश्न निकाली काढला आणि अमित शहा यांना भारतीय जनता पक्षाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतरच्या पोलादी पुरुषाची उपमा दिली.
राममंदिर प्रश्नाची सोडवणूक मार्गी लागली आणि संरक्षणमंत्री व कणखर नेते राजनाथ सिंह यांनी समान नागरी कायदा आणण्यासाठी ’समय आ गया हैं’ असे ठणकावून सांगत सूतोवाच केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील नागरिकांना ओळखपत्र देण्याचा कायदा संसदेत आणून या देशात बेकायदेशीर घुसखोरी करणार्यांना जबरदस्त तडाखा दिला आहे. यामुळे एकूणच ’नरसिंह रावे रचिला पाया, नरेंद्र मोदी झालासे कळस!’ असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या जबरदस्त कामगिरीबद्दल अभिनंदन!
-योगेश त्रिवेदी (9892935321)