Breaking News

हे क्रौर्य येते कोठून?

चंगळवादी जिण्यामुळे माणसाची नीतीमत्ता, विवेक लयाला जाईल, असा इशारा अनेक विचारवंतांनी चंगळवादाची लाट येण्याच्या अगोदर दिला होता. सद्यस्थितीतील बोकाळलेला चंगळवाद, धकाधकीच्या जगण्याचा ताण, हरवत चाललेला परस्पर संवाद, कुटुंब आदी सामाजिक संस्थांची पडझड या सार्‍याविषयी पोकळ चर्चा न करता त्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा आहे.

नोव्हेंबर संपून डिसेंबर सुरू होण्याच्या सुमारास हैदराबादच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने अवघा देश संतप्त झालेला असतानाच वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी झळकून गेली. माहिमच्या किनार्‍यावर एका सुटकेसमध्ये खांद्यापासून कापलेला एक हात, तसाच अर्धवट कापलेला पाय, पुरुषाच्या जननेंद्रियाचा भाग असे मानवी शरीराचे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेले आढळून आले. अशातर्‍हेने सुटकेसमधून मृतदेह वाहून येणे हीदेखील आता विरळा घटना राहिलेली नाही. अधूनमधून कुठे ना कुठे अशातर्‍हेने मृतदेह आढळून आल्याच्या बातम्या येतच असतात. माहिमला वाहून आलेल्या त्या सुटकेसमधील मानवी देहाच्या तुकड्यांचा मागोवा मात्र पोलिसांनी बर्‍यापैकी वेगाने घेतला असून त्यातून समोर आलेले प्रकरण काँक्रिटचे जंगल बनलेल्या या महानगरात कितीतरी कमालीच्या गूढ कहाण्या दडलेल्या असाव्यात याची झलक दाखवणारे आहे. सुटकेसमधील कपड्यांवरून संबंधित टेलरचा माग काढून, खेरीज फेसबुकवरील प्रोफाइलमधून पोलीस थेट वाकोल्याच्या एका गिटारिस्टचा शोध घ्यायला जातात काय आणि त्याच्या कथित दत्तक घेतलेल्या, 19 वर्षांच्या मुलीने आपल्या 16 वर्षांच्या प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केल्याचे उघडकीस येते काय? हैदराबादेत एका निष्पाप तरुणीचा आपल्या लैंगिक हव्यासातून बळी घेणार्‍या त्या चौघांना पोलिसांनी कथित न्याय करत अवघ्या काही दिवसांत यमसदनी धाडले सुद्धा आणि त्याचा आनंद जवळपास देशभरात साजरा झाला. त्यांच्या क्रौर्याचा, विधिनिषेधशून्य वागण्याचा लोकांना संताप आला. हातावर पोट असणारे, खालच्या स्तरातील जिणे जगणार्‍या त्या चौघांमध्ये कुठलीही नीतीमत्ता नव्हती की माणसाकडून अपेक्षिली जाणारी संवेदनशीलताही नव्हती. पण आता या 19 वर्षांच्या तरुणीबद्दल व तिच्या 16 वर्षांच्या प्रियकराबद्दल काय म्हणावे? तीन दिवस हे दोघे जण त्या मृतदेहाचे घरात तुकडे करीत होते. हा खून त्यांनी नीट कट रचून केला असल्याचेही समोर आले आहे. त्याकरिता धारदार सुरे, मृतदेहाची दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून एअर प्युरिफायरच्या कित्येक बाटल्या अशी सगळी सामग्री त्यांनी खरेदी केली होती. तो गिटारिस्ट आपले लैंगिक शोषण करीत असल्याचा दावा आता त्या तरुणीने केला आहे. त्या माणसाचा वावर आपल्याला आवडत नव्हता पण आसपासच्या कुणाची काही तक्रार नसल्याने आपण गप्प राहत होतो असे त्या परिसरातील अन्य एका महिलेनेही म्हटले आहे. तो खरोखरीच त्या तरुणीचे शोषण करीत होता, का त्याचे घर बळकावण्याच्या हेतूने हा खून केला गेला आहे याचा शोध पोलीस आपल्या पद्धतीने घेतीलच. परंतु सराईत गुन्हेगार नसलेल्या, सर्वसामान्य जिणे जगणार्‍या प्रौढत्वाच्या उंबरठ्याच्या आगेमागे असलेल्या या तरुण-तरुणीचे हे क्रौर्य निश्चितच समाजाने विचारात घ्यावे असे आहे. या सुटकेस प्रकरणासारख्या इतर अनेक प्रकरणांमधून समाजाचा या आघाडीवरचा र्‍हासच डोकावतो आहे. एक-दोन विरळा घटना म्हणून या घटनांकडे दुर्लक्ष न करता आपल्या शिक्षणातून नीतीमूल्यांचा हा र्‍हास थोपवण्याचे प्रयत्न व्हायला हवे आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply