Breaking News

न्याय झाला, पण अत्याचार कधी थांबणार?

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी हे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या नराधमांनी पीडित डॉक्टरला बलात्कारानंतर ज्या ठिकाणी जाळून टाकले होते त्याच ठिकाणी चारही आरोपींचा खात्मा झाला. यामुळे न्याय झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटली, तर काहींनी मात्र आरोपींना अशा पद्धतीने मारण्याबाबत नापसंती तसेच संशयही व्यक्त केला आहे. हैदराबादमधील घटना ताजी असतानाच उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. या गुन्हेगारांनादेखील वेळीच शिक्षा मिळाली असती, तर आज त्या पीडितेचा बळी गेला नसता. दुर्दैवाने आपल्या देशातील पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन व्यवस्थेचे वासनांध सैतानांना भय राहिले नाही. म्हणूनच अत्याचाराची मालिका काही संपायचे नाव घेत नाही.

हल्ली एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी एखाद्या मुली-महिलेवर लैंगिक अत्याचार झाला नाही. दररोजचे वर्तमानपत्र हाती घेतल्यावर अथवा टीव्हीवरील बातम्या बघताना बलात्काराच्या एक ना अनेक घटना समोर येतात. चिमुरडीपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत नारीवर्गाला आपल्या लैंगिक वासनेचे शिकार बनविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. ही गंभीर बाब आहे. सन 2012मध्ये राजधानी दिल्लीत एका तरुणीवर धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला होता. मित्रासोबत चाललेल्या ज्योती सिंग या 23 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला आणि दोघांनाही मारहाण करून जखमी अवस्थेत बसमधून फेकून दिले. काही दिवसांनी ज्योतीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी मोर्चे काढले, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने केली. घटनेचे गांभीर्य ओळखून हे कृत्य करणार्‍या सहाही नराधमांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आणि त्यांच्यावर जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले गेले. त्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन आरोपींना फाशी होईल असे सर्वांना वाटत होते, पण या घटनेला सात वर्षे व्हायला आली तरी आरोपींना शासन काही झाले नाही. यातील राम सिंह (बसचालक) नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांची शिक्षा झाली, तर विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतिमत: फाशीची शिक्षा सुनावली. यापैकी विनयने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. हा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. राष्ट्रपतींनी विनयचा दयेचा अर्ज नामंजूर केल्यास सर्व चार दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा मार्ग

मोकळा होणार आहे.

दिल्ली असो की उन्नाव, कठुआ, कोपर्डी… आणि आता हैदराबाद येथे घडलेली बलात्कार व हत्येची घटना; संबंधित नराधमांनी जे पाशवी अत्याचार केले ते जनावरालाही लाजविणारे आहेत. या पार्श्वभूमीवर हैदराबाद पोलिसांनी आरोपींचा केलेला एन्काऊंटर रास्तच आहे. आता आरोपी खरोखरंच पळून चालले होते की पोलिसांनी त्यांचा ठरवून खात्माकेला हे त्यांना व त्यांच्या वरिष्ठांनाच माहीत. कदाचित तेथील सरकारलाही याबाबत कल्पना असेल. काहीही असो झाले ते योग्यच झाले आणि ते ठरवून केले गेले असेल, तर यापेक्षा चांगला न्याय काय असू शकतो. याविरोधात काहींनी गळेही काढले आहेत. हा प्रसंग त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर गुदरला असता, तर त्यांनी आरोपींबाबत चुकीचे झाले, त्यांना अशा पद्धतीने शिक्षा द्यायला नको होती, असे म्हटले असते का?

हैदराबादेतील एन्काऊंटरची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्कार पीडितेच्या झालेल्या मृत्यूनंतर अशा आरोपींवर शक्य तितक्या लवकर कारवाई करणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट झाले. उन्नावमधील तरुणीवर गेल्या वर्षी प्रियकराने बलात्कार केला होता. या दुष्कृत्यात त्याला त्याच्या मित्रानेही साथ दिली. आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देऊन विश्वासघात केल्याने पीडितेला मानसिक धक्का बसला. न्यायासाठी तिने पोलिसांकडे धाव घेतली, मात्र कायद्याच्या रक्षकांनीच पोलीस ठाण्याच्या फेर्‍या मारायला लावल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी हात वर केल्याने पीडितेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आरोपींच्या विरोधात केस दाखल झाल्यानंतर पीडितेसह तिच्या कुटुंबाला धमक्या येऊ लागल्या. पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, 5 डिसेंबरला पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात होती. याच केससंदर्भात पीडिता सकाळी कोर्टात जात असताना आरोपींनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. तिला आरोपींनी केवळ जाळलेच नाही, तर तिच्यावर काठीने हल्ला केला, तसेच आग लावण्यापूर्वी तिच्या गळ्यावर वारही केले. ती भोवळ येऊन खाली पडल्यानंतर तिच्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले, अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. एवढ्या थराला जाणार्‍यांवर दया का व कशी दाखवायची? मुख्य मुद्दा हा आहे की आरोपींची इथवर मजल जातेच कशी? 

बर्‍याचदा अशा प्रकारच्या गुन्ह्याप्रकरणी सर्वप्रथम पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. एखाद्या घटनेविरोधात समाजातून संतप्त पडसाद उमटल्यावर आणि संबंधित घटना माध्यमांत आल्यावर आरोपींचा तपास सुरू करून त्यांची धरपकड केली जाते. काही वेळा आरोपींना पाठीशी घातल्याचाही आरोप होतो. मग आधीच कोलमडलेली पीडित व्यक्ती व तिचे कुटुंबीय हतबल होतात. दुसरीकडे आरोपींना बळ मिळते आणि ते निर्ढावून पुढे अधिक भयानक गुन्हा करतात. समजा अशा वेळी पोलिसांनी चोख कारवाई केलीच, तर न्यायालयात तारखांचा खेळ सुरू होतो. या ‘तारीख पे तारीख’मुळे खटला रखडतो. शिवाय वकिलांमार्फत कायद्याच्या पळवाटांचा सर्रास वापर करून आरोपी शिक्षा लांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जलदगती न्यायालयाचा काहीच अर्थ उरत नाही.

बलात्काराची घटना केंद्रस्थानी आल्यावर त्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. त्यानंतर मात्र सारे जण नवी घटना घडेपर्यंत ती सोयीस्करपणे विसरून जातात. ते पाहता बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना कराव्या लागतील. त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणजे न्यायालयातील खटले विशिष्ट कालमर्यादा घालून निकाली काढणे आवश्यक आहे. पोलिसांनाही मुली-स्त्रियांना निर्भयपणे वावरता येण्यासाठी वातावरण तयार करावे लागेल. मुख्य म्हणजे सर्वांनाच पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल. त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:च्या घरापासून करणे गरजेचे आहे. विशेषत: लहान मुलांवर चांगले संस्कार करून मुली-महिलांना आदर, सन्मान दिल्यास दुष्कर्म निश्चितपणे घटतील.

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply