भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर नव्हे तर वाढती गुन्हेगारी व सुरक्षितताविषयक प्रश्नांच्या संदर्भात या आकडेवारीकडे निश्चितपणे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. प्रत्येक भाषिक वर्ग आपली एक संस्कृती सोबत घेऊन वावरत असतो. कामाप्रतीची निष्ठा, स्त्रियांना दिली जाणारी वागणूक, एकंदर सामाजिक व्यवहारात पाळली जाणारी नीतीमत्ता आदींचा या सांस्कृतिक वर्तणुकीत समावेश करता येईल. जो बदल आपल्या अवतीभवती दिसतो आहे, तो आकडेवारीच्या स्वरूपात समोर आला, तर धक्का बसत नाही, परंतु ही आकडेवारी भुवया उंचवाव्या इतकी अचंबित करणारी असली, तर मात्र निश्चितपणे धक्का बसतो. मुंबईतला मराठी टक्का घसरतो आहे, हे वास्तव तर अवघा मराठी समाज गेली तीन-चार दशके नीट जाणून आहे. दक्षिण मुंबईतील मराठी कुटुंबांपैकी कित्येक याच काळात मुंबईबाहेर कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई-पनवेल येेथे स्थलांतर करते झाले. उपनगरातील मंडळी अशीच त्याही पलीकडे स्थलांतरित झाली. मुंबईतला ‘मराठी टक्का घसरला’ हे सारेच जाणून असले, तरी याच काळात मुंबईतल्या हिंदी भाषिकांची संख्या नेमकी किती अफाट वेगाने वाढली याची कल्पना शहराची सत्ता पुरेपूर उपभोगणार्या, मराठी अस्मितेचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या पक्षालाही बहुदा आली नसावी. गेल्या 10 वर्षांच्या काळात स्थलांतरामुळे मुंबईतील मराठी भाषिकांची संख्या अडीच टक्क्यांनी घटली असून हिंदी भाषिकांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. याहूनही धक्कादायक आकडेवारी म्हणजे, याच काळात ठाणे जिल्ह्यात हिंदी भाषिकांची संख्या 80 टक्क्यांनी, तर रायगड जिल्ह्यात ती 87 टक्क्यांनी वाढली आहे. 2011च्या जनगणनेतील मातृभाषेसंदर्भातील आकडेवारीतून हे चित्र समोर आले आहे. मराठी अस्मितेच्या नावावर भावना भडकवून उदयाला आलेल्या पक्षाच्या दहशतीतून स्थलांतरितांनी त्या आधीच्या जनगणनेत आपली मातृभाषा उघड केली नसावी आणि नंतरच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांत ‘हिंदी मातृभाषा’ सांगण्याची भीती न वाटल्याने अचानकपणे हा आकडा कमालीचा फुगून समोर आला असावा, असे काही तज्ज्ञ मंडळी म्हणतात. संकुचित राजकारणाच्या सोयीसाठी कधी मराठी अस्मिता, तर कधी धार्मिक अभिमानाला काखोटीला मारणारे ही आकडेवारी पुढे करून मराठी समाजाला चुचकारण्याचा आव आता नक्की आणतील, पण त्यांचे दाखवायचे दात निराळे आहेत, हे मराठी जनता नीट ओळखून आहे. मुुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्यावर राज्यातून मुंबई शहरात होणारे कामगारांचे स्थलांतर बरेचसे कमी झाले. त्यात राज्यात अन्य शहरांचा चांगला विकास झाल्याने ग्रामीण भागातील जनता तिकडे वळली. महानगरी मुंबईपेक्षा या अन्य शहरांचा मराठी चेहरा त्यांना अधिक आपलासा व सुरक्षित वाटला असावा. याउलट असंघटित व कामाची सुरक्षितता न देणार्या सेवा क्षेत्रात याच काळात स्थलांतरित हिंदी भाषिकांची संख्या झपाट्याने वाढली. पाच-दहा हजारांसाठी खून पाडणारी गुन्हेगारी मानसिकता एका विशिष्ट सांस्कृतिक परिस्थितीत तयार होते. मुंबई एक सुरक्षित कॉस्मोपॉलिटन शहर होते त्या काळात तेथे महाराष्ट्रीय सहिष्णु संस्कृतीचा प्रभाव होता. मुंबईचा ‘मराठी’ चेहरामोहरा पुसला जाताना तिची ‘सुरक्षित शहर’ ही ओळख देखील मागे पडत चालली आहे, हा बदल निश्चितपणे लक्षात घेण्याची गरज आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …